पुणे / प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या मल्लांच्याच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला क्रीडामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.








