नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2022 या वर्षात भारताने उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. यासंबंधीची पीएमआय आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये उत्पादनवाढीचा निर्देशांक 57.8 टक्के असा नोंदविण्यात आला. फेब्रुवारी 2021 पासूनच मागणीत वाढ होत असल्याने उत्पादन क्षेत्रात ही वाढ नोंदविण्यात आली. एस. अँड पी. ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स निर्देशांकानुसार नोव्हेंबरमध्ये ही वाढ 55.7 टक्के होती. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत पीएमआय निर्देशांक सरासरी 56.3 टक्के इतका राहिला आहे.
डिसेंबर महिन्यात उत्पादनात वाढ झाल्याने उत्पादन केंद्रांमध्ये नवे रोजगारही निर्माण झाले आहेत त्यामुळे कारखान्यांनी नवी कर्मचारी भरती केल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये उत्पादन आणि कर्मचारी भरती या दोन्ही बाबी निम्नतम पातळीवर होत्या. मात्र पुढील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यात मोठी वाढ दिसून आली. मात्र, सध्या जागतिक मंदी असल्याने विदेशातून येणाऱया ऑर्डर्सच्या प्रमाणात कमतरता दिसून आली असेही आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.









