अर्ज करण्याचे आवाहन : बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी खात्याचे प्रयत्न
बेळगाव : राष्ट्रीय बागायत मिशन योजनेंतर्गत विविध बागायती पिकांना अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना 90 टक्के तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बागायत खात्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन बसविण्यासाठी 5 हेक्टरपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिके घेणे सोयिस्कर होणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेंतर्गत केळी, द्राक्षे, डाळिंब, आंबा, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, पेरु यासह भाजीपाला व फुल शेतीसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अलिकडे शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून बागायत शेतीचे प्रमाण वाढू लागले आहे. बागायत शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. बागायत शेतकऱ्यांना शेती बरोबर फार्महाऊस, शितगृह आणि इतर सुविधांसाठी अनुदान मंजूर होणार आहे. जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक बागायत शेतकरी आहेत. विविध फळे, स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावीत यासाठी बागायत शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे विविध पिकांबरोबर ठिबक सिंचन पद्धतीसाठी अनुदान मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी या पद्धतीकडे वळले आहेत. त्यामुळे मागणीही वाढू लागली आहे. यासाठी खात्याने अनुदान उपलब्ध केले आहे.
बागायत खात्याशी संपर्क साधावा
बागायत शेती बरोबर फार्महाऊस, ठिबक सिंचन, प्रक्रिया प्रकल्प, शितगृह आदींसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका बागायत खात्याशी संपर्क साधावा. बागायत शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
महांतेश मुरगोड-बागायत खाते सहसंचालक









