नवी दिल्ली : 64 व्या सुब्रतो चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला येथे मंगळवार 19 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा तीन विविध गटात खेळविली जाणार असून त्यामध्ये एकूण 106 संघांचा समावेश आहे. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय संघांचाही सहभाग यावेळी करण्यात आला आहे. सदर स्पर्धा 17 वर्षांखालील कनिष्ठ मुलांच्या, 17 वर्षांखालील कनिष्ठ मुलींच्या तसेच 15 वर्षांखालील उपकनिष्ठ मुलांच्या विभागात घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीने आयोजित केली असून या स्पर्धेला एअरफोर्स स्पोर्ट्स मंडळाने पुरस्कृत केली आहे. दिल्ली, बेंगळूर आणि एनसीआर येथे ही स्पर्धा भरविली जाणार असून 25 सप्टेंबरपर्यंत स्पर्धेतील सामने खेळविले जातील. यावेळी लंका आणि नेपाळ देशातील आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांनाही निमंत्रीत केले आहे.
देशातील युवा फुटबॉलपटूंना अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या हेतुने एअरमार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी 1960 साली या स्पर्धेला प्रारंभ केला होता. दिल्ली येथे कनिष्ठ मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेला 19 ऑगस्टपासून प्रारंभ होईल. 15 वर्षांखालील उपकनिष्ठ मुलांची ही स्पर्धा बेंगळूरमध्ये 2 सप्टेंबर रोजी सुरू होईल तर कनिष्ठ मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा दिल्ली एनसीआरमध्ये 16 सप्टेंबरपासून घेतली जाईल. दिल्ली एनसीआरमधील सामने डॉ. आंबेडकर स्टेडियम, तेजस फुटबॉल मैदान, सुब्रतो पार्क फुटबॉल मैदान, पिंटु पार्क फुटबॉल मैदानावर होतील तर बेंगळूरमधील स्पर्धेतील सामने एअरफोर्स स्कूल जलहळ्ळी, एअरफोर्स यलहंका आणि हेडक्वॉर्टर्स ट्रेनिंग कमांड फुटबॉल मैदानावर आयोजित केले आहे.









