वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
19 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत तीन ठिकाणी होणाऱ्या सुब्रतो चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असलेल्या शहरांच्या यादीत बेंगळूरचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्वांत जुनी राष्ट्रीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा यापूर्वी दिल्ली आणि गुऊग्राम येथे आयोजित करण्यात आली होती.
17 वर्षांखालील कनिष्ठ मुलगे आणि मुलींच्या स्पर्धा दिल्ली-एनसीआरमध्ये आयोजित केल्या जातील, तर 14 वर्षांखालील उपकनिष्ठ गटातील मुलांच्या स्पर्धा एएससी सेंटर, एअर फोर्स स्कूल, जलाहल्ली आणि एअर फोर्स स्कूल, येहलंका या बेंगळूरमधील मैदानांवर खेळविल्या जातील. दिल्ली-एनसीआरमध्ये आंबेडकर स्टेडियम, तेजस फुटबॉल मैदान (दिल्ली), सुब्रतो फुटबॉल मैदान (दिल्ली) आणि जी. डी. गोएंका स्कूल (गुऊग्राम) येथे सामने खेळविले जातील.
27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 109 संघ तीन विभागांत सहभागी होणार आहेत. बांगलादेश आणि नेपाळमधील संघ या स्पर्धेवर आंतरराष्ट्रीय साज चढवणार असून 180 हून अधिक सामने त्यात खेळविले जाणार आहेत. पिलग्रिम हायर सेकेंडरी स्कूल, दिमापूर (नागालँड) हे कनिष्ठ मुलांच्या स्पर्धेतील गतविजेते, तर सेंट पॅट्रिक्स स्कूल, गुमला (झारखंड) हे कनिष्ठ मुलींच्या गटातील गतविजेते आहेत. उपकनिष्ठ मुलांच्या गटात हैरोक उच्च माध्यमिक विद्यालय, इंफाळ (मणिपूर) हे मागील स्पर्धेचे विजेते आहेत.









