चिपळूण :
यापुढे कंपनीतील सांडपाण्याचे टँकर बाहेर जाताच कामा नये. यासाठी कंपनीमध्ये आपला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करावा. त्यासाठी आठवडाभरात झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज)चा प्रस्ताव सादर करा, अशा स्पष्ट सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
कामथे नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडल्याप्रकरणी कारवाईच्या फेऱ्यात अडकलेल्या गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीची सुनावणी सोमवारी मुंबईत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष कदम यांच्या उपस्थितीत झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील नदीत 21 जूनच्या रात्री टँकरद्वारे रसायनमिश्रित पाणी सोडल्याप्रकरणी प्रारंभी कंपनीला उत्पादन बंदची नोटीस दिली. त्यानंतर कंपनीच्या विनंतीनुसार आठच तासात या नोटीसीला 10 दिवसांची स्थगिती दिली. ही स्थगिती उठल्यानंतर एमआयडीसीने पाणीपुरवठा खंडित केल्याने उत्पादन ठप्प झाले. मात्र पुन्हा विनंती केल्यावर उत्पादन सुरू करण्यास पुन्हा तात्पुरती परवानगी दिली. सोमवारच्या सुनावणीत या सर्व प्रकारावर अध्यक्ष कदम यांनी नाराजी व्यक्त केली.
कंपनीतून जे सांडपाणी बाहेर पाठवले जाते, त्यावर यापुढे कंपनीतच अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करा. कंपनीतून यापुढे सांडपाण्याचे टँकर बाहेर जाणार नाहीत, यादृष्टीने ‘झेडएलडी’चा प्रस्ताव सादर करा. त्यासाठी काय करावे लागेल ते सांगून आठवडाभरात त्या संबंधीचा प्रस्ताव सादर करा. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे अध्यक्ष कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जलप्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख साळुंखे, कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, चिपळूणचे उपप्रादेशिक अधिकारी एच. आर. कुलकर्णी, कंपनीचे संचालक मुथ्थू आदी उपस्थित होते.








