बेंगळूर येथील बैठकीत जिल्हा प्रशासनाला सूचना
बेळगाव : कॅन्टोन्मेंट हद्दीतील बंगलो एरियासह नागरी वसाहतींचे हस्तांतरण व्हावे, अशी मागणी करण्यात आल्याने मागील महिन्याभरापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कॅन्टोन्मेंटच्या वसाहतींचे महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या आठ दिवसांत राज्य सरकारकडे सादर करावा, अशा सूचना कॅन्टोन्मेंट हस्तांतरणासाठी सोमवारी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. केंद्र सरकारचा संरक्षण विभाग, राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक सोमवारी सायंकाळी बेंगळूर येथे पार पडली. या बैठकीमध्ये हस्तांतरण प्रक्रिया सुलभ व्हावी, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मण्णूरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यात केवळ एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावमध्ये आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने 112 एकर जमीन महापालिकेकडे हस्तांतरण करण्यास परवानगी दर्शवली होती. परंतु यामध्ये बंगलो एरियाचा समावेश नसल्याने नागरिकांनी विरोध केला. लोकप्रतिनिधींनीही विरोध दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरी वसाहतींमध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया राबविली. परंतु कॅन्टोन्मेंटकडून नकाशे दिले जात नसल्याने सर्वेक्षणावर मर्यादा येत असल्याची तक्रार महापालिका अधिकाऱ्यांनी केली होती. सोमवारी सकाळी बेंगळूर येथे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसंदर्भात बैठक होणार होती. परंतु राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने ही बैठक सायंकाळी उशिराने सुरू झाली. हस्तांतरण प्रक्रिया करताना बंगलो एरियाचा विचार झाल्यास किती एकर जमीन महापालिकेकडे जाऊ शकते, तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कोणते प्रयत्न करणार यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
खासदारांकडून कॅन्टोन्मेंटमध्ये पाहणी
खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी सायंकाळी कॅम्प परिसराला भेट दिली. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी नागरी वसाहती, तसेच बंगलो एरियाची माहिती जाणून घेतली. नागरिकांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यामुळे पुढील कॅन्टोन्मेंट बैठकीत खासदार शेट्टर या विषयावर आवाज उठविण्याची शक्यता आहे.









