जागतिक बँकेच्या पथकाच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
रंकाळा, कळंबा तलावासह शेंडापार्क परिसराची पाहणी
कोल्हापूर
भूस्खलन सौम्मीकरणाच्या प्रकल्पाची कमीत कमी वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी मित्रा संस्थेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना जागतिक बँकेच्या पथकाने जिल्हा प्रशासनाला केल्या. रंकाळा, कळंबा तलाव, शेंडा पार्क परिसराची पाहणी केली.
कोल्हापूर जिह्यातील भूस्खलन सौम्मीकरणाच्या कामांबाबत जागतिक बँकेच्या पथकाची शुक्रवारी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जोतिबा डोंगरावर झालेल्या भुस्खलनाच्या ठिकाणी भूस्खलन सौम्मीकरणाची कामे जलद होणे आवश्यक आहे. जिह्यात निर्माण होण्राया पूर परिस्थिती नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून यासाठी जागतिक बँक व मित्रा संस्थेने वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.
जिह्यात भूस्खलन होण्राया ठिकाणांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत आयरेकर यांनी जागतिक बँकेच्या पथकासमोर सादरीकरण केले. पंचगंगा-कृष्णा नदीच्या महापूर नियंत्रणासाठी उपाययोजना व भूस्खलनाच्या सौम्मीकरणासाठी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 338 कोटींचा निधी जागतिक बँक देणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिह्यातील अतिवृष्टी, महापुर, भूस्खलन आदी आपत्तीप्रवण कारणे पाहून पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी जागतिक बँकेचे पथक गुरुवार 23 व शुक्रवार 24 जानेवारी या दोन्ही दिवशी कोल्हापूर व सांगली जिह्याची पाहणी या पथकाने केली.
जागतिक बँकेच्या या पथकाने गुरुवारी पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. राधानगरी धरण, धरणाचे पाणलोट क्षेत्र, स्वयंचलीत दरवाजांची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरण परिसरातील पावसाच्या नोंदीची व या भागातील पूर परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर प्रयाग चिखली, महापालिकेची पाणी उपसा केंद्रे, व्हिनस कॉर्नर व शहरात पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणांनाही त्यांनी भेट देऊन या भागाची पाहणी केली होती.
आमदार अमल महाडिक, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, जागतिक बँकेच्या जोलंता क्रिस्पीन, अनुप कारनाथ, शीना अरोरा, जर्क गॅन उपस्थित होते. तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षदीप घाटगे, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
मनपा अभियंत्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्या
जागतिक बँकेच्या पथकाचे अनुप कारनाथ म्हणाले, या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेने मनपाच्या अभियंत्यांना आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण द्यावे. जेणेकरुन महापूराची परिस्थिती उद्भवल्यास अशा परिस्थितीत जलद निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सक्षम होईल.








