कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेच्या इमारतीसाठी जागेसाठी विविध पर्यायांची चाचपणी करुन, इमारतीसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करा अशा सुचना आमदार अमल महाडिक यांनी दिल्या. या निधीसाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करु असे आश्वासनही त्यांनी दिले. शुक्रवारी आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेमध्ये शहरातील विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. नगरोत्थानमधील उर्वरीत 178 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यापैकी जीएसटीसाठी निधी जादा गेला आहे. यामुळे उर्वरीत कामांसाठी निधीची कमतरता असल्याचे प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. याचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवा याबाबत पाठपुरावा करु असे आश्वासन अमल महाडीक यांनी दिले. शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, 174 ठिकाणचा कचरा दररोज उचलणे गरजेचे आहे. यासाठी आणखीन 30 टिप्परचा प्रस्ताव द्या विशेष बाब म्हणून यासाठी प्रयत्न करु असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
अमृत 1 व अमृत 2 यातील कामे पुर्ण झाली असून, 5 मार्च पर्यंत यातील 6 टाक्या वितरणासाठी सुरु करण्यात येणार असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. तसेच नगरोत्थानमधून 278 कोटी रुपये मंजूर झाले होते, यापैकी केवळ 100 कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरीत निधीचा प्रस्ताव तयार करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. याचसोबत शहरातील 4 मैदानांच्या देखभाल दुरुस्तीसह नुतनीकरणाचे प्रस्तावही तयार करुन देण्याच्या सुचना आमदार महाडिक यांनी केल्या. महापालिकेच्या गाळेधारकांचा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून प्रलंबीत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आली. महापालिकेच्या वतीने गाळेधारकांना अग्नीशमन आणि परवाना असे दोन कर आकारण्यात येत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. याबाबत 15 दिवसांमध्ये सर्व्हे करुन अहवाल देण्याच्या सुचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या. याचसोबत शहरातील पार्किंग व्यवस्था, सर्व सिग्नल सुरु करणे, ताराराणी पुतळ्यापासून दसरा चौकापर्यंत पार्किंगचे नियोजन करणे याच्याही सुचना आमदार महाडिक यांनी दिल्या.
बैठकीला अतिरीक्त आयुक्त राहूल रोकडे, नगररचना सहाय्यक संचालक विनय झगडे, उप शहररचनाकार रमेश म्हस्कर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, उपायुक्त संजय सरनाईक उपस्थित होते.
शहरातील 2 उड्डाणपुलांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुचना दिल्या आहेत. यानुसार खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. पंचगंगा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळास प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे महाडिक यांनी सांगितले. तसेच शहरासाठी अजूनही 3 ते 4 स्प्रिंक्लरसाठी निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- शिंगणापूर उपसा केंद्र सक्षम करणार
थेट पाईपलाईन योजनेला पर्याय उपलब्ध असावा यासाठी शिंगणापूर योजना सक्षम करण्याची मागणी होत आहे. यासाठी 25 ते 30 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून शिंगणापूर योजनाही सक्षम करण्यात येणार आहे. याचसोबत महावीतरण आणि महापालिका यांची बैठक घेवून थेट पाईपलाईन योजनेच्या विद्युत पुरवठ्यावरही तोडगा काढण्यात येणार असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले.
- सिग्नल, उपसा केंद्र सोलरवर
शहरातील सर्व सिग्नल सोलरवर सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार करावा, नाविन्यपुर्ण योजनेमधून यासाठी निधी देवू असे आमदार महाडिक यांनी सांगितले. यापैकी 2 सिग्नल प्रायोगीत तत्वावर सोलरवर सुरु करण्यात येणार आहेत. याचसोबत महापालिकेचा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेची सर्व उपसा केंद्रही सोलरवर सुरु करण्याचा विचार आहे. पुईखडी आणि कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्र सोलरवर करण्याचा 6 कोटी रुपयांचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात आला आहे.








