सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला निर्देश ः व्हॅन थेट रुग्णालयात का नेली नाही?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अतीक अन् अशरफ हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तरप्रदेश सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. न्यायालयाने हत्या प्रकरणी विस्तृत अहवाल मागविला आहे. हत्येच्या दिवशी काय घडले आणि तपास कुठवर आला अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. याचबरोबर 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींच्या एन्कांउटरचा अहवाल सादर करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे.
अतीक-अशरफला रुग्णालयात नेले जातेय याची माहिती मारेकऱयांना कशी मिळाली? अतीक-अशरफ यांना नेणारे वाहन थेट रुग्णालयात का नेण्यात आले नाही असे प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 3 आठवडय़ांनी होणार आहे.
अतीक-अशरफ यांची 15 एप्रिल रोजी रात्री 10.35 वाजता प्रयागराजच्या कॉल्विन रुग्णालयाबाहेर गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. लवतेश तिवारी, सनी सिंह आणि अरुण मौर्य यांनी गोळीबारानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. उमेश पाल हत्याप्रकरणात पोलिसांकडून झालेल्या एन्काउंटरमध्ये आतापर्यंत 4 आरोपी मारले गेले आहेत. यात अतीकचा मुलगा असद, गुलाम, अरबाज, उस्मान चौधरीचा समावेश आहे. पोलीस कोठडीत झालेल्या या खळबळजनक हत्येनंतर उत्तरप्रदेश सरकारने एसआयटीसोबत न्यायालयीन आयोग स्थापन केला होता.









