खोल पाण्यात वाळूखाली गाडला गेला होता खजिना
इटलीच्या सार्डिनिया किनाऱ्यापासून काही अंतरावर एका पाणबुड्याला खोल पाण्यात प्राचीन नाण्यांचा खजिना मिळाला आहे. ही नाणी वाळूखाली दडली गेलेली होती. सापडलेल्या नाण्यांची संख्या हजारोंमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही नाणी ब्रॉन्झ मेटलद्वारे तयार करण्यात आली आहेत. तर ज्या पाणबुड्याला ही नाणी मिळाली त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. पाणबुड्याला सार्डिनियाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर धातूची एखादी वस्तू दिसून आली, त्यात हजारो प्राचीन ब्रॉन्झ नाणी होती. या पाणबुड्याने खजिन्याविषयी अधिकाऱ्यांना कळविले, ज्यानंतर इटलीच्या संस्कृती मंत्रालयाने अंडरसी
आर्कियालॉजी डिपार्टमेंटच्या तज्ञांसोबत आर्ट प्रोटेक्शन स्क्वॉडमध्ये नियुक्त पाणबुड्यांना संबंधित स्थळी पाठविले होते. पाणबुड्याला आढळलेली नाणी अत्यंत जुनी असून ती चौथ्या शतकापूर्वीची असल्याचे सांगण्यात आले. प्राचीन नाणी भूमध्यसमुद्रातील बेटापासून काही अंतरावर आढळली आहेत. या नाण्यांचे एकूण वजना पाहता किमान 30 हजार ते 50 हजार नाणी असू शकतात. यातील काही नाण्यांचे नुकसान झालेले होते असे इटलीच्या सरकारकडून सांगण्यात आले. अरजाचेनाच्या समुद्रात आढळलेला हा खजिना अलिकडच्या वर्षांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण शोध आहे. हा शोध पुरातत्व वारशाची समृद्धी आणि महत्त्वाचा आणखी एक पुरावा असल्याचे उद्गार सार्डिनियन पुरातत्व विभागाचे अधिकारी लुइगी ला रोक्का यांनी काढले आहेत.









