कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : उपनोंदणी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सर्व्हरडाऊनचा फटका सहन करावा लागला. यामुळे आपल्या विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सर्व्हरडाऊनमुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागल्याचे चित्र दिसून आले. यामुळे दोन दिवसांच्या सुटीनंतर आलेल्या कामाचा खोळंबा तर झालाच शिवाय बराच वेळेचा अपव्यय झाल्याचेही पहावयास मिळाले. उपनोंदणी कार्यालयात मालमत्ता नोंदणी, खरेदी-विक्री करार, विवाह नोंदणी, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क, मालमत्ता मालकीचे हस्तांतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, ईसी काढणे आदी कामे करण्यात येतात. शनिवार व रविवार दोन दिवस सुटी होती. यामुळे उपनोंदणी कार्यालयात सोमवारी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. उपनोंदणीचे काम करताना विविध कागदपत्रेही सोबत घेऊन जावे लागते. उर्वरित कागदपत्रांची जुळवाजुळव कार्यालयात गेल्यानंतर करावी लागते. यातच नागरिकांची दमछाक होते.
सर्व्हरच्या प्रतीक्षेते नागरिक
मात्र सकाळपासूनच सर्व्हरडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडली होती. परिणामी सर्व्हरच्या प्रतीक्षेत नागरिकांना ताटकळत बसावे लागल्याचेही पहावयास मिळाले. काही वेळा येणे, पुन्हा परत जाणे, असा जणू लपंडावच सर्व्हरकडून होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होती. दोन दिवसांच्या सुटीनंतर सुरू नागरिकांची वर्दळ नित्याचीच असते. मात्र कामासाठी आलेल्या नागरिकांना सर्व्हरडाऊनची समस्या भेडसावत असल्याने त्यांची नाराजी प्रकटपणे दिसून येते. यामुळे काहीवेळा वादविवादाच्या घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातही सर्व्हरचा लपंडाव
उपनोंदणी कार्यालयाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातही सर्व्हरचा लपंडाव सुरू होता. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची माहिती व अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातून नागरिक येत असतात. अधिकाऱ्यांना भेटून आपल्या समस्यांचे निवारण करण्याचा त्यांची पराकाष्टा सुरू असते. पण हे करत असताना जर सर्व्हरडाऊनची नजर लागल्यास लांबचा प्रवास करून येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व्हरडाऊनचा फटका सदर नागरिकांना बसल्याचेही दिसून आले.
सर्व्हरडाऊनची समस्या कायमस्वरुपी सोडवा
सर्व्हरडाऊनची समस्या सततची झाली आहे. मात्र याकडे शासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नागरिक लवकरात लवकर काम आटोपण्याचा प्रयत्न करत असतात. पण सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे त्यांचा वेळ, पैसा व नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. आपले काम करून घेण्यासाठी नागरिकांना लांबचा प्रवास करून कार्यालयांमध्ये यावे लागते. प्रसंगी पायपीट करावी लागते. जर सर्व्हरची समस्या आल्यास त्यांना आर्थिक संकटाचा सामानाही करावा लागतो. याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन वारंवार होणारी सर्व्हरडाऊनची समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी होत आहे.









