रिअल इस्टेट व्यक्तीकडून दिवसाढवळ्या धमकी
बेळगाव : कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने खरेदीचा व्यवहार करण्यास नकार दिलेल्या प्रभारी उपनोंदणी अधिकाऱ्यांना रिअल इस्टेट व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उपनोंदणी कार्यालयात सोमवारी घडला. यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर व्यक्तीच्या वर्तनामुळे अधिकाऱ्यांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. तर सदर घटनेमुळे कार्यालयात चर्चेला ऊत आला होता. लोकप्रतिनिधी व मानव हक्क आयोगाचे नाव पुढे करत सदर रिअल इस्टेट व्यक्तीने प्रभारी उपनोंदणी अधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखविल्याचा प्रकार घडला आहे. रिअल इस्टेट व्यक्तीकडून जीपीच्या आधारावर जमिनीची खरेदी-विक्री केली जात होती.
दरम्यान सदर व्यक्तीकडून देण्यात आलेल्या कागदपत्रातील चकबंदी नकाशा व जीपीमधील चकबंदी नकाशामध्ये ताळमेळ झाला नसल्याने प्रभारी उपनोंदणी अधिकाऱ्यांकडून सदर व्यवहार करण्यास (डी नोट) नकार दिला. त्यामुळे रिअल इस्टेट व्यक्तीने अधिकाऱ्यांवर दबाव घातला. चकबंदी नकाशा जुळत नसल्याने अधिकाऱ्याने नकार दर्शविला. यावरून अधिकाऱ्यांना धमकी देऊन बंदुकीचा धाक दाखविला. दिवसाढवळ्या नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने उपनोंदणी कार्यालयात धमकी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. अधिकाऱ्यांना राजकीय व्यक्तींची ओळख सांगून अशाप्रकारे धमकावण्याचे प्रकार घडत असल्याने अधिकाऱ्यांना कोण वाली आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत होता. नागरिकांची गर्दी असतानाही अधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखविल्याची चर्चा रंगली होती.









