मोहन शेटे यांचे प्रतिपादन : लोकमान्य व्याख्यानमालेला प्रारंभ : भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य समजावे या उद्देशाने आयोजन
बेळगाव : शिवचरित्र हे भुतकाळात रमण्यासाठी नाही तर भविष्यात भरारी घेण्यासाठी आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला पराक्रम तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु अफझलखानचा वध यामधून शिवरायांचे नियोजन, संघटना, दूरदृष्टी याची जाणीव होते. शत्रुच्या मुलखात जाऊन युद्ध करण्यापेक्षा शत्रुलाच आपल्याजवळ बोलावून नेस्तनाबुत करणे ही कला जगाच्या पाठीवर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच अवगत होती, असे विचार पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे यांनी मांडले. लोकमान्य कल्चरल फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. त्यांनी सोमवारी ‘अफझलखान वध’ या विषयी व्याख्यान दिले. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, विठ्ठल प्रभु, सुबोध गावडे व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे उपस्थित होते.
ते म्हणाले, वयाच्या 18 व्यावर्षी छत्रपतांनी राजगड किल्ला बांधला. जगातील सर्वोत्तम आर्किटेक्चरचा नमुना म्हणून आजही या किल्ल्याकडे अभ्यासपूर्वक पाहिले जाते. बलाढ्या अफझलखानाला मात देण्यासाठी शिवरायांनी जावळीच्या खोऱ्याची निवड केली. कारण त्यांनी त्या परिसराचा सखोल अभ्यास केला असल्यामुळे तेथील डोंगर-दऱ्या यांची त्यांना जाण होती. यामध्ये अफझलखानचे सैन्य टिकणार नाही, हे माहिती असल्यामुळेच त्यांनी यासाठी प्रतापगडाची निवड केली. यामधून शिवरायांच्या युद्धचातुर्याची ओळख होते, असा उल्लेख त्यांनी केला. पंढरी परब म्हणाले, भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य समजावे या उद्देशाने लोकमान्य सोसायटीने व्याख्यानाचा उपक्रम राबविला आहे. लोकमान्य सोसायटीने ‘जाणता राजा’ महानाट्या तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. बेळगावमधील शिवजयंतीला विधायक रूप देण्यामध्ये लोकमान्य सोसायटीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य सोसायटीचे पीआरओ राजु नाईक यांनी केले. मंगळवार दि. 21 रोजी ‘पावनखिंडीचे युद्ध’ या विषयावर मोहन शेटे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी झालेल्या व्याख्यानाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.









