मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे तरुण पिढीला आवाहन : गोवा विद्यापीठातील अध्यासनाचा लाभ घ्यावा
कुंकळ्ळी : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन साजरा करून व श्री सप्तकोटिश्वराच्या मंदिराची फेरबांधणी करून सरकार थांबणार नाही. तरुण पिढीला शिवाजी महाराज काय ते अवगत व्हावे याकरिता गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाची स्थापना केली आहे. तेथे तरुण पिढीला त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्याची संधी मिळणार असून त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली व देशभर पोहोचविली. शिवकालीन प्रशासन, व्यवस्थापन, अर्थव्यवस्था, शेती, जलसंवर्धन इत्यादी नेहमीच अभ्यासाचे विषय राहिले असून त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे सावंत म्हणाले. 350 वा शिवराज्याभिषेकदिन साजरा करताना वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम शालेय, महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवर आयोजित करण्याच्या दृष्टीने संकल्पना मांडली जाणार आहे. त्याकरिता शिक्षण खात्याने व पुरातत्त्व खात्याने जबाबदारी घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते सुऊवातीला मुख्यमंत्री सावंत यांनी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, इतिहासतज्ञ सचिन मदगे, पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तपोभूमीवरील ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पूजाअर्चा केली, अभिषेक केला व नंतर पुष्पहार अर्पण केला. अन्य मंत्री, आमदार, केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, बेतूल सरपंच, क्षत्रिय खारवी पारंपरिक मच्छीमार संघटना, शिवप्रेमी संघटना व इतर मान्यवरांनीही पुतळ्यावर पुष्पांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास सरकार कटिबद्ध आहे. 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी गोवा कसा असायला हवा यासाठी आतापासूनच लक्ष केंद्रीत केले पाहिजे. गावचा विकास म्हणजे गोव्याचा विकास ही संकल्पना पुढे नेताना राजकारणाला पूर्ण फाटा देऊन गावांचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे सावंत यांनी सांगितले. पोर्तुगीजकालीन खुणा पुसून नवीन वाटचाल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बेतूल येथील कॅप्टन ऑफ पोर्ट्सच्या अखत्यारित असलेली जागा पुरातत्त्व खात्याकडे हस्तांतरित करण्याचे सोपस्कार पूर्ण झाले की, बेतूल येथील किल्ल्याचा विकास केला जाईल. गोव्यातील उद्धवस्त करण्यात आलेली मंदिरे, किल्ले यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प सरकारने केला आहे, असे ते म्हणाले. शिवरायांच्या रणनीतीचा अभ्यास केला पाहिजे. मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज खरे रयतेचे राजा होते. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा अभ्यास करावा, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. शिवरायांनी कूटनीती, राजनीतीचा पुरेपूर वापर करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे विकासकामांसाठी योग्य सहकार्य मिळत असून मुख्यमंत्री म्हणून ते निष्पक्षपणे कार्य करत असल्याचे उद्गार काढले. बाबू कवळेकर यांनी आपल्या भाषणात अनेक विकासकामांचा उल्लेख केला. डॉ. नीलेश फळदेसाई यांनी प्रास्ताविक, तर पुरातत्त्व खात्याचे अधिकारी बालाजी यांनी सूत्रनिवेदन केले.









