सहा राज्यांतील वनाधिकारी शिवाजी कागणीकर यांच्या प्रकल्पस्थळी : शासनाच्या मदतीविना बंबरग्यातील कार्य पाहून अधिकारी अचंबित

प्रतिनिधी /बेळगाव
कडोली येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी ग्रामस्थ आणि जनजागरण समितीच्या सहकार्यातून बंबरगा, कट्टणभावी, निंगेनहट्टी आणि गुरामट्टी या भागात राबविलेल्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’सारख्या प्रकल्पांना धारवाड येथील पाणी आणि माती यावर संशोधन आणि संरक्षण करणाऱया संस्थेतील वरि÷ अधिकाऱयांसह टेनिंगसाठी 7 राज्यांतील वनाधिकाऱयांनी नुकतीच भेट देऊन माहिती घेतली. शासनाचे कोणतेही सहकार्य नसताना केलेले कार्य पाहून अधिकारी अचंबित झाले.

दुष्काळग्रस्त भाग म्हणून परिचित असलेल्या आणि डेंगर भागात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या बंबरगा, कट्टणभावी, निंगेनहट्टी आणि गुरामट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी ग्रामस्थांची साथ आणि जनजागरण संस्थेच्या सहकार्याने पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प राबविण्याबरोबर ‘माती अडवा आणि पाणी जिरवा’ हा आगळावेगळा प्रकल्प राबवून या भागाचा कायापालट केला आहे. सर्वत्र पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प राबविण्याकडे कल आहे, परंतु शिवाजी कागणीकर यांनी पाण्याबरोबर माती वाहून जावू नये, हा उद्देश समोर ठेवून ‘माती अडवा पाणी जिरवा’ हा प्रकल्प राबवून जमिनीची झीजही थोपविली आहे, शिवाय पाणी जिरविण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरविला. डोंगर-खोऱयात चरी काढून बांधांवर हजारो झाडे लावली. परिणामी वनराईही सजली आणि या भागाचा कायापालट झाला. या भागातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढली, शिवाय हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. शिवाजी कागणीकर यांनी गोबर गॅसबरोबर अनेक ठिकाणी जागृती निर्माण करून सामाजिक कार्ये केली आहेत. याबद्दल त्यांना राज्य शासनाचा आणि इतर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

वाल्मी संस्थेकडून अभ्यास दौरा
पाणी आणि माती यावर संशोधन आणि संरक्षण करणारी राज्य शासननिर्मित वनखात्याची धारवाड येथे संस्था असून या संस्थेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम, मध्यप्रदेश, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू आदी राज्यांतील 75 वनाधिकारी ट्रेनिंगसाठी धारवाड येथे आले होते. या 6 दिवसांच्या ट्रेंनिगमध्ये बंबरगा, कट्टणभावी, निंगेनहट्टी, गुरामट्टी या भागाचा अभ्यासदौरा सुनिश्चित करून अधिकाऱयांनी शिवाजी कागणीकर यांनी राबविलेल्या प्रकल्पांची पाहणी करून माहिती घेतली. संस्थेचे असिस्टंट डायरेक्टर महादेव गौडा, साहाय्यक फकिरप्पा अगली, नागरत्न होसमनी, फॉरेस्ट खात्याचे वरि÷ अधिकारी चंद्रकांत गोंधळी, एस. एस. पुजारी, वैज्ञानिक वनाधिकारी जी. के. हिरेमठ, त्यांच्या पत्नी स्नेहा आणि अधिकाऱयांनी या संपूर्ण वनराईची पाहणी करून शासनाच्या मदतीविना एक कार्यकर्ता परिसराचा कायापालट करू शकतो, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी वनराई आणि पाणी अडवा पाणी जिरवा याचे महत्त्व, भविष्यात पाण्याची आवश्यकता, शिवाय एकंदरीत देशभरात वनराईचा भाग किती पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती दिली.









