रुक्ष आणि निरस पद्धतीने यांत्रिकपणे मुलांना अभ्यास शिकविल्यास बहुतेक विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी प्रेम वाटेनासे होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे काही कल्पक शिक्षक विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या मार्गांचा उपयोग करुन त्यांना अभ्यास आणि शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बहुतेक विद्यार्थ्यांना नाच आणि गाणी आवडतात. त्यांचे नृत्यप्रेम लक्षात घेऊन बिहारमधील जमुई जिल्ह्यातील कल्याणपूर येथील केंद्रीय विद्यालयात जीतेंद्र शार्दूल नामक शिक्षकाने नृत्याच्या माध्यमातून अभ्यास शिकविण्याचा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

शार्दूल हे अभ्यासाच्या विषयांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांचेही प्रशिक्षण या शाळेत देतात. त्यांनी नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी एक विशेष पद्धती विकसीत केली आहे. त्यामुळे अभ्यासाचा अवघड भागही लीलया विद्यार्थ्यांच्या मनात ठसतो. अगदी गणिताच्या सूत्रांसह इतर बाबीही संगीताच्या माध्यमातून शिकविण्याचा या शिक्षकांचा प्रयत्न असतो. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ते प्रिय झाले आहेत. त्यांच्या शाळेत आता विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.
आपले ध्येय गरीब विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाविषयी प्रेम निर्माण करणे आणि त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे हा आहे. यासाठी विविध मार्गांचा विचार करीत असता नृत्य आणि गाणी किंवा संगीत हे माध्यम प्रभावी ठरते हे आपल्या लक्षात आले. त्यामुळे अभ्यासक्रमाचे रुपांतर या मार्गाला अनुकूल असे करण्यात आले. आता विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात असे प्रतिपादन शार्दूल करतात.









