खांडेपार नदीच्या पात्राची केली प्रत्यक्ष पाहणी : बाणस्तारी, आमोणे, गांजे, कणपुंबीलाही भेट
फोंडा : म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या ‘प्रवाह’ प्राधिकरणाच्या विशेष समितीने भर पावसात काल शुक्रवारी दुपारी जलस्रोत खात्याच्या टिमसह ओपा खांडेपार येथील जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली. तेथील हायड्रोलिक गेटवरून खांडेपार नदीच्या प्रवाहाचा अभ्यास केला. यावेळी प्रवाह समितीत जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, शैलेश नाईक, पद्मनाभ तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या समितीने नंतर आमोणे, बाणस्तारी, ओपा व त्यानंतर गांजे पंपिंग हाऊस येथे भेटी देऊन तेथील नदीच्या पाण्याचा अभ्यास केला. कणकुंबी येथून कळसा-भांडुरा प्रकल्पातून म्हादई नदीचे पाणी मलप्रभेत वळविण्याच्या ठिकाणीही म्हादई प्रवाह समितीने भेट देऊन अभ्यास केला. अभ्यासअंती पूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांना तसेच प्रवाह प्राधिकरणाला आणि केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती समितीतील सूत्रांनी दिली.
ही पाहणी म्हणजे गोव्याची एक मागणी मान्य
गोव्यात येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने मलप्रभा नदीत वळवले असून ते समजण्यास सोपे जावे म्हणून पावसाळ्dयात पाहणी करण्याची मागणी गोव्यातर्फे म्हादई प्रवाह प्राधिकरण, केंद्र सरकार, न्यायालयात करण्यात आली होती. ती मागणी मान्य झाली असून त्यानुसारच सध्या भर पावसात गोव्यात हा अभ्यास सुरु आहे. या पाहणीचा गोव्याला लाभ होणार असून कर्नाटकचे पितळ उघडे पडणार आहे. गोव्यासह कर्नाटक तसेच महारष्ट्रच्या भागातही भेटी देऊन ही समिती अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.









