व्याख्याते गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी साधला मनसोक्त संवाद
वार्ताहर /सांबरा
मुलांनी केवळ परीक्षा देऊन मार्क मिळविण्यासाठी अभ्यास न करता संबंधित विषयाशी एकरुप होऊन अभ्यास केला पाहिजे व शिकण्याचा आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. ते रविवार दि. 10 रोजी मुचंडी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यामध्ये प्रमुख वत्ते या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अलीकडे मुलांचे शिक्षण हे परीक्षा व मार्क यांच्या भोवतीच मर्यादित झाले आहे. त्यामुळे मुलांनी त्या पलीकडे जाऊन तो विषय समजून घेऊन मन मोकळेपणाने अभ्यास केला पाहिजे. अभ्यासासह विविध खेळ खेळले पाहिजेत, पुस्तके वाचली पाहिजेत, एकमेकांच्या अनुभवांची देवाण-घेवाण केली पाहिजे.प्रत्येकाच्या जीवनातील शाळेचे दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत, याची जाणिव ठेऊन विद्यार्थ्यांनी याचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे.
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा
सध्या पालकांच्याही मुलांकडून अनेक अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यांना चांगली शिकवण द्या. मुलांनीही आई-वडिलांना विसरू नये, आई-वडील मुलांचे भविष्य घडविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात. त्या कष्टांची जाणीव ठेवून मुलांनीही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांनी युवकांना व्यवसायाबद्दल अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर रात्री 8 वा. लोकसंस्कृती नाट्या कला संस्था खानापूर आयोजित शाहीर अभिजीत कालेकर लिखित मराठी लोक संस्कृतीची ओळख करून देणारा ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विनोद, संस्कार, मनोरंजन यांची सांगड घातलेला तसेच गण-गवळण, बतावणी, वासुदेव, हेळवी, गोंधळ व लावणी इत्यादी विषयांचे दर्शन घडविण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अमृतमहोत्सव समिती, एसडीएमसी समिती, माजी विद्यार्थी संघटना, आजी-माजी शिक्षकवर्ग, आजी-माजी विद्यार्थी, ग्रा. पं. सदस्य, गावातील सर्व युवक मंडळे व संघ-संस्थांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.









