29 मे पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ : 60 टक्के वितरण पूर्ण, जिल्ह्यात 5 कोटी 9 लाख पुस्तकांची मागणी
बेळगाव : सरकारी, खासगी व अनुदानित शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी 60 टक्के पाठ्यापुस्तके शाळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे सोयीचे होणार आहे. 29 मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. यावर्षी बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यासाठी 5 कोटी 9 लाख 10 हजार 578 मोफत पाठ्यापुस्तकांची आवश्यकता आहे. तर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 23 लाख 68 हजार 494 पाठ्यापुस्तकांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील 60 टक्के शाळांना यापूर्वीच पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी 43 टक्के पुस्तके शाळांमध्ये पोहोचली आहेत.
जिल्ह्यात 1491 सरकारी प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1491 सरकारी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 1595 सरकारी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 35 लाख 89 हजार 358 मोफत पाठ्यापुस्तकांची आवश्यकता आहे. तर खासगी शाळांसाठी 10 लाख 40 हजार 845 पुस्तके मागविण्यात आली आहेत. यापैकी 28 लाख 3 हजार 404 पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे.
चिकोडी जिल्ह्यात 47.32 लाख पाठ्यापुस्तकांची आवश्यकता
चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 47 लाख 32 हजार 120 मोफत पाठ्यापुस्तकांची आवश्यकता आहे. तर खासगी शाळांनी 13 लाख 17 हजार 649 पाठ्यापुस्तकांची मागणी केली आहे. त्यापैकी 36 लाख 84 हजार 999 पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित पुस्तके येत्या चार दिवसात शाळांपर्यंत पोहोचली जाणार आहेत. बेळगाव शहर विभागात सध्या पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात येत असल्याने मुख्याध्यापक व साहाय्यक शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
गणवेशांचेही वितरण
मागील दोन वर्षांमध्ये पाठ्यापुस्तके उपलब्ध झाली. परंतु गणवेश उशिराने मिळाले. अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर गणवेश देण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासाठी यावर्षी शाळेच्या सुरुवातीपासूनच गणवेश वितरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार दोन जोड गणवेश शाळांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.
आतापर्यंत 60 टक्के पुस्तकांचे वितरण
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके मिळावीत यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 60 टक्के पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पुस्तकांचे वितरण येत्या चार दिवसात पूर्ण केले जाईल.
– लिलावती हिरेमठ (जिल्हा शिक्षणाधिकारी)









