अहिल्या परकाळे कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत दरवर्षी जवळपास 2 लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी काही विद्यार्थी अनुतीर्ण होतात आणि त्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे नवीन शिक्षण कायद्यातील तरतूदीनुसार आणि शिवाजी विद्यापीठासह शिखर संस्थांच्या नियमांच्या अधीन राहून, विद्यापीठ अंतर्गत सर्वच अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष प्रवेश संधी (कॅरी ऑन) देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रथम वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात नियमित शिक्षण घेता येईल. प्रथम वर्षातील दोन्ही सेमिस्टरचे सर्व विषय सुटल्यानंतर चौथ्या सत्रात प्रवेश मिळेल. विद्यार्थी हिताचा निर्णय असल्याने विद्यापीठातील परीक्षा विभागाने घेतलेल्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तरचे जवळपास 2 लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, कॉम्प्युटर सायन्स यासह अन्य अभ्यासक्रमांना अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण नगन्य आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी नसते. परंतू विद्यापीठ अंतर्गत अभियांत्रिकीचे 8 हजार तर विधी विभागाचे 4 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विभागांचे अभ्यासक्रम कठीण असल्याने या दोन्ही अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांना बॅकलॉक मिळतो. त्यामुळे वारंवार या विद्यार्थ्यांकडून फेरपरीक्षा घेण्याची मागणी होत असते. त्याचबरोबर नवीन शिक्षण कायद्यानुसार स्वायत्त झालेल्या कॉलेज आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागाने पहिल्या दोन सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे प्रवेश देवून शिक्षण घेण्याची संधी दिली आहे. परंतू तिसऱ्या सत्रातील परीक्षेदरम्यान पहिल्या व दुसऱ्या सत्रातील सर्व पेपर सोडवणे किंवा एटीकेटी मिळवणे बंधनकारक आहे. अन्यथा चौथ्या सत्राला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पहिल्या वर्षातील सर्व पेपर सुटले आणि दुसऱ्या वर्षात एटीकेटी असेल तरीही तिसऱ्या वर्षातील पाचव्या सेमिस्टरला प्रवेश मिळेल. परंतू पहिल्या व दुसऱ्या वर्षात अनुत्तीर्ण झाला तर तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाणार नाही. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यापीठ प्रशासनाने एआयसीटी, बार कौन्सिल, विद्यापीठ नियमावली व सर्व शिखर संस्थांच्या नियमावलीचे पालन केले आहे. या प्रवेशाचा फायदा विद्यापीठ अंतर्गत सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
अभियांत्रिकी व विधीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
दरवर्षी अभियांत्रिकीचे 7 हजार 542 पैकी 1 हजार 432 विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. तर विधी (लॉ) 3 हजार 200 पैकी 950 विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. ही सरासरी असल्याने याचा तोटा या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरवर्षी होतो. परिणामी त्यांच्यात नैराश्याचे वातावरण निर्माण होते. या नैराश्यामध्येच ते दबावतंत्राचा वापर करीत विद्यापीठ प्रशासनाला पुर्नपरीक्षा घेण्याची मागणी करीत असतात. म्हणूनच त्यांना विशेष प्रवेशाची संधी देवून विद्यापीठाने एक प्रकारे एक नवी उमेद आणि दिलासा दिला आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसान होणार नाही
शैक्षणिक वर्ष वाया जावून नये म्हणून अधिकार मंडळांच्या मान्यतेने परीक्षा विभागाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची विशेष संधी दिली आहे. ऐवढेच नाही तर विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. हा निर्णय स्वागतार्ह असून विद्यार्थ्यांना आनंद देणारा असला तरी नियमांचे पालन करणे तितकेच महत्वाचे आहे.
नियमांचे पालन करूनच प्रवेश निश्चिती
अधिकार मंडळांनी विद्यार्थी हित लक्षात घेवून विशेष प्रवेश संधी ‘कॅरी ऑन’ चा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या वर्गात तात्पुरत्या प्रवेश निश्चितीसाठी मागील परीक्षेत एटीकेटी मिळवणे किंवा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिखर संस्थांचा दंडक, नियम, परिनियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती करण्यात येईल.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)