आजपासून शिक्षक शाळेत तर उद्यापासून विद्यार्थ्यांची हजेरी
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवार दि. 29 मे पासून प्रारंभ होणार आहे. पहिले दोन दिवस शाळांची स्वच्छता, तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 30 पासून विद्यार्थी शाळेत हजर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून 73 टक्के गणवेश व 83 टक्के पाठ्यापुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित पुरवठा येत्या दोन दिवसांत केला जाणारसरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 1 ते 15 जून दरम्यान नोंदणी केली जाणार आहे.
त्याचबरोबर 1 ते 20 जून दरम्यान मागील वर्षाचा अभ्यासक्रम यासाठी सेतूबंध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही पुस्तके व गणवेश पुरवठा, तसेच तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मध्यान्ह आहारासाठी स्वच्छतेची मोहीम शाळांमध्ये राबविली जाणार आहे. जेवण करण्याची खोली, स्वयंपाकाची भांडी, तसेच इतर साहित्याची स्वच्छता करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 46 लाख 40 हजार पाठ्यापुस्तकांची मागणी करण्यात आली. तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 46 लाख 49 हजार पाठ्यापुस्तकांची मागणी होती. यापैकी 83 टक्के पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. आहे. शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत नुकतीच बैठक झाली. यावेळी मुख्याध्यापकांना प्रवेशासंदर्भात माहिती दिली.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 15 शैक्षणिक विभाग…
बेळगाव जिल्ह्यात एकूण 15 शैक्षणिक विभाग आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 7 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 8 विभाग आहेत. बेळगावमध्ये 1491 सरकारी शाळा आहेत. 1354 प्राथमिक तर 137 माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळा शुक्रवारपासून पुन्हा गजबजणार आहेत.









