प्राध्यापकाच्या छळ, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या बालासोर येथे लैंगिक शोषणामुळे त्रस्त होत आत्मदहन करून घेतलेल्या विद्यार्थिनीवर मंगळवारी तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी उपस्थित राहत विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहिली आहे. तर मृत विद्यार्थिनीच्या पित्याने सरकारने दिलेल्या भरपाईला नाकारले आहे. आम्हाला भरपाई नको तर मुलगी हवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसने 17 जुलै रोजी ओडिशा बंदची हाक दिली आहे.
बालासोर येथील फकीर मोहन महाविद्यालयात प्राध्यापकाकडून झालेल्या लैंगिक शोषणामुळे त्रस्त होत स्वत:ला पेटवून घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला होता. विद्यार्थिनीच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बालासोरचे भाजप खासदार प्रताप सारंगी आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माझ्या मुलीने मला लढणे शिकविले आहे आणि मी तिचा लढा जारी ठेवणार आहे. मला पैसे किंवा भरपाईची रक्कम नको, मला माझी मुलगी परत हवी आहे. सरकार मला माझी मुलगी परत मिळवून देऊ शकते का असे विद्यार्थिनीच्या पित्याने म्हटले आहे. राज्य सरकार तिला न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरले, याचमुळे तिने स्वत:चा जीव दिला. तिने आमदारापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांकडे दाद मागितली होती असे सांगत विद्यार्थिनीच्या आजोबांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेसकडून बंदची घोषणा
ओडिशा काँग्रेस अध्यक्ष भक्त चरण दास यांनी विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून 17 जुलै रोजी राज्य बंदची हाक दिली आहे. विद्यार्थिनीने न्यायासाठी प्रत्येक दार ठोठावले, तिने एफआयआर देखील नोंदविला तरीही तिला न्याय मिळू शकला नाही. आमदार, खासदाराने देखील तिचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. याप्रकरणी किंचित कारवाई झाली असती तरीही तिने हा टोकाचा निर्णय घेतला नसता. याप्रकरणी शिक्षणमंत्री, आमदार अणि खासदार तिघांनीही राजीनामा द्यावा अशी आमची मागणी असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
12 जुलै रोजी स्वत:ला घेतले पेटवून
फकीर मोहन कॉलेजमध्ये बीएडचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी 12 जुलै रोजी विभागप्रमुखावर लैंगिक शोषणाचा आरोप करत स्वत:ला पेटवून घेतले होते. विभागप्रमुखाने लैंगिक आणि मानसिक शोष्घ्ण केल्याचा आरोप तिने त्यापूर्वी केला होता. विद्यार्थिनीचे सोमवारी रात्री उशिरा भुवनेश्वर एम्समध्ये निधन झाले होते.
प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक निलंबित
घटनेपूर्वी विद्यार्थिनीने प्राचार्य दिलीप घोष यांच्याकडे तक्रार नोंदविली होती, परंतु तिला तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले. तर विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ओडिशा सरकारने प्रारंभिक पुराव्यांच्या आधारावर सहाय्यक प्राध्यापक समीरा कुमार साहू, प्राचार्य दिलीप कुमार घोष यांना निलंबित केले आहे. साहू आणि घोष या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
व्यवस्थेने घेतला बळी : राहुल गांधी
ओडिशातील या विद्यार्थिनीचा बळी व्यवस्थेनेच घेतला आहे. ओडिशात न्यायासाठी लढणाऱ्या एका मुलीचा मृत्यू, हा थेट स्वरुपात भाजपच्या व्यवस्थेकडुन करण्यात आलेल्या हत्येचा प्रकार आहे. त्या शूर विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. परंतु न्याय मिळवून देण्याऐवजी तिला धमकाविण्यात आले. वारंवार अपमानित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.









