खानापूर आगारप्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज
गुंजी : खानापूर-गुंजी महामार्गावर धावणाऱ्या खानापूर आगाराच्या जटगा आणि करंजाळ बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी व नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या आठवड्यातच सकाळी सात वाजता धावणारी जटगा बस खानापूरहून येत असतानाच नादुरुस्त झाली. परिणामी या बसच्या प्रतीक्षेत असलेल्या जटगा गावाबरोबरच गुंजी, सावरगाळीपर्यंतच्या सर्व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत पोहोचता आले नाही. तर सोमवारीही सकाळी खानापूरकडे जाताना संगरगाळीनजीक बस नादुरुस्त झाल्याने दुरुस्ती होईपर्यंत बसमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत थांबण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे सोमवारीही सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या तासाला मुकावे लागले तर काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि चाचणी पेपरांना मुकावे लागल्याची वेळ ओढवली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय यापूर्वी जटगा बसही जटगा गावाहून सकाळी गुंजीला 7:45 वाजता धावत होती. मात्र सध्या ती वेळेत धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी खानापूर आगारप्रमुखांनी याचा सारासार विचार करून या मार्गावर सुस्थितीत आणि नियमित वेळेत बसेस सोडाव्यात, अशी आग्रही मागणी होत आहे.









