बसेस भरून येत असल्याने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास : बसेस थांबवण्याची मागणी
वार्ताहर/हलशी
नंदगड येथील पोलीस ठाण्याच्या समोरील बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठी बस मिळवण्यासाठी ताटकळत राहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी हल्याळ, बिडी भागातून येणाऱ्या बस खचाखच भरुन येतात. तसेच काही बसेस जाणीवपूर्वक थांबवण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. नंदगड-हलशी भागातून हायस्कूल तसेच महाविद्यालय आणि इतर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खानापूर आणि बेळगाव येथे जातात. सकाळ 7 वाजल्यापासूनच नंदगडच्या दोन्ही बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शक्ती योजना सुरू झाल्यापासून बसचालक आणि वाहक विद्यार्थ्यांना पाहून बस थांबवतच नसल्याचे दिसून येत आहे. तसेच हल्याळ-बिडी भागातून येणाऱ्या बसेस खचाखच भरलेल्या असतात. विद्यार्थ्यांना शाळेवर वेळेत पोहचण्यासाठी अशा खचाखच भरलेल्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
सकाळच्या वेळेत बसेस थांबत नसल्याने संताप
शक्ती योजना सुरू झाल्यापासून काही आगारानी नंदगड-यल्लापूर, हल्याळ मार्गावरील बसेस कमी केल्याने बसेसना गर्दी होत आहे. सकाळी 7 तें 10 या वेळेत नंदगड येथून शिक्षणासाठी विद्यार्थी बेळगाव आणि खानापूर येथे जातात. नेमके याचवेळी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना थांबलेल्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या विरोधात वेळोवेळी मागणी करुनदेखील बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत नंदगड येथील दोन्ही बसस्थानकांवर बस थांबव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.









