राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र : दलित, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सुधारणा व्हावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्याच्या समस्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल यांनी वसतिगृहातील असुविधांचा उल्लेख केला आहे. मागील महिन्यात बिहारमधील आंबेडकर हॉस्टेलला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी समस्यांचा उल्लेख केला होता असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर राहुल यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला.
दलित, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायांच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीला विलंब होऊ नये असे राहुल यांनी नमूद केले आहे. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या दलित विद्यार्थ्यांची संख्या जवळपास निम्मी झाली आहे. 2023 मध्ये ही संख्या 1.36 लाख होती, जी 2024 मध्ये कमी होत 0.69 लाखावर आल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
देशातील दलित, अनुसूचित जमाती, अतिमागास वर्ग, अन्य मागास वर्ग आणि अल्पसंख्याक समुदायांच्या विद्यार्थ्यांच्या हिताकरता केंद्र सरकारने निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांची स्थिती ‘दयनीय’ असल्याचा दावा राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे
विद्यार्थ्यांशी निगडित वसतिगृह अन् शिष्यवृत्ती या दोन मुद्द्यांवर तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. वंचित समुदायांशी संबंधित 910 टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिष्यवृत्ती वेळेत न मिळणे आणि वसतिगृहांच्या खराब स्थितीमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या भेटीचा उल्लेख
बिहारच्या दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहाच्या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी केल्या. वसतिगृहातील एकाच खोलीत 6-7 विद्यार्थ्यांना राहण्यास भाग पाडले जाते. तेथील शौचालयांची स्थिती अत्यंत खराब आहे. तेथील पिण्याचे पाणीही आरोग्यासाठी असुरक्षित आहे. भोजनालयाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही. पुस्तकालये किंवा इंटरनेट यासारख्या मूलभूत सुविधा देखील नाहीत असा दावा राहुल यांनी स्वत:च्या बिहार दौऱ्याच्या अनुभवाचा उल्लेख करत केला आहे.
पोर्टल ठप्प झाल्याने त्रास
वंचित समुदायांशी संबंधित विद्यार्थ्याना दहावीनंतर योग्यवेळी शिष्यवृत्ती मिळत नसल्याची स्थिती आहे. बिहारमध्ये शिष्यवृत्ती पोर्टल तीन वर्षांपर्यंत ठप्प राहिले. 2021-22 मध्ये एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळू शकली नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांना केले होते संबोधित
राहुल गांधी हे 15 मे रोजी बिहारच्या दरगंभा दौऱ्यावर पोहोचले होते. तेथे त्यांनी आंबेडकर छात्रावासमध्ये ‘शिक्षण न्याय संवाद’ कार्यक्रमाला संबोधित केले होते. 90 टक्के लोकसंख्येसाठी या देशात कुठलाच मार्ग नाही. मनरेगाची यादी पाहिल्यास सर्व लोक वंचित समुदायाशी संबंधित असतात. मजुरांची यादी काढली तरीही हेच चित्र आहे. सर्व रक्कम अन् कंत्राटं 8-10 टक्के लोकांच्या हातीच जातात असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. तर राहुल यांच्या या कार्यक्रमावरून वादही झाला, त्यांना वसतिगृहात जाण्याची अनुमती मिळाली नव्हती, तरीही त्यांनी तेथे कार्यक्रम आयोजित केल्याने प्रशासनाने आक्षेप घेतला होता.









