शिक्षण जीवनातील एक मोठे व्यासपीठ : व्हीटीयूमध्ये पदवीदान समारंभावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे आवाहन
बेळगाव : देशाकडून आपल्याला अनेक प्रकारे मदत मिळाली आहे. यासाठी आपली जबाबदारी आहे की, आपणही राष्ट्राला काही तरी दिले पाहिजेत. ती वेळ आता आली आहे. ती तुमची जबाबदारी आहे. शिक्षण हे शाळा, महाविद्यालयांपुरता मर्यादीत नाही तर ते जीवनातील एक मोठे व्यासपीठ आहे. शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे कोणत्याही स्तरावर शिक्षण थांबवू नये, असे प्रतिपादन व्हीटीयूचे कुलपती व राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या 23 व्या (भाग 2) पदवीदान समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामन मॅक्सेस आणि कर्नाटक राज्योत्सव प्रशस्तीप्राप्त, शेल्को फौंडेशनचे संस्थापक डॉ. हरिष हंदे, उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर उपस्थित होते.
नाविन्यता भविष्याची मोठी पायरी
ते म्हणाले, नाविन्यता भविष्याची मोठी पायरी आहे. जातीकारणाच्या स्पर्धात्मक युगात नाविन्यतेची आवश्यकता आहे. यामुळे पारदर्शक आणि परिणामकारी प्रशासनावरील पर्याय आहे. त्यामुळे जगातील इतर देशातील सरकारकडून नाविन्यला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रमाणे विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेणे थांबवू नये, असे आवाहन त्यांनी केले व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. हरिष हंदे म्हणाले, आताच्या पदवीधरांनी देशाच्या विकासासाठी आणि ज्ञान व कौशल्याचा उपयोग करून घ्यावा. देशामध्ये मागासवर्गीय क्षेत्रांच्या व तेथील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. सामाजिकरित्या मागासलेल्या गोर-गरीब नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या ज्ञानाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तांत्रिक पदवीधरांनी तांत्रिक विकासाबरोबर सामाजिक विकास साधण्यासाठी काम करावे. या माध्यमातून देशाची नैसर्गिक संपत्ती, त्याचे सौंदर्य, संस्कृती, परंपरा अधिक बळकट कराव्यात. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांवर तोडगा काढू तेव्हाच ते पुरक ठरणार आहे. सध्या पदवीधरांकडून सुरू असलेल्या संशोधनाचा विषय समाजाच्या विकासासाठी पुरक रहावा, प्रगतीमध्ये त्याची अंमलबजावणी करावी त्या दृष्टीने चिंतन करावे, असे त्यांनी सांगितले.
देशाची संस्कृती, परंपरा, लोकशाहीचा आदर्श ठेवा
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यानीं आनंद व्यक्त करत अभिनंदन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे देशाला जागतिकस्तरावर मोठा मान मिळत आहे. कर्नाटक सरकार व्हीटीयूच्या सहयोगाने कलबुर्गी, तळकल आणि म्हैसूर येथे विशेष कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारली जात आहेत. या माध्यमातून कौशल्या आधारीत गुणात्मक शिक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पदवीधर हे केवळ आपल्या पेशासाठी इतकेच नाही तर देशासाठीही बौद्धिक संपत्ती आहेत. आपल्या देशाची संस्कृती, परंपरा, लोकशाही याचा आदर्श ठेऊन वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एमबीएच्या 4514, एमसीए 4024, एमटेक 920, एमआर्च 44, एम प्लॅन 27, 688, पीएचडी 2, एमएसई संशोधन 2 संशोधनावर 692 जणांना पदवी बहाल करण्यात आली. यावेळी व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. यांनी मान्यवरांचे स्वागत केले व व्हीटीयूच्या योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी निबंधक प्रा. टी. एस. श्dरीनिवास, प्रा. बी. ई. रंगस्वामी, एम. ए. सपना, डीन प्रा. सदाशिव गौड यांच्यासह व्हीटीयूचे इतर विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









