अमूल्य फौंडेशनच्या डॉ. आरती भंडारी यांचे प्रतिपादन
वार्ताहर /कणकुंबी
पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा योग्य आणि जपून वापर करण्याची आतापासून विद्यार्थ्यांनी सवय लावून घेतली तर भविष्यात पाण्याचे संकट टळेल. अन्यथा पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. पावसाचे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही पद्धत प्रत्येकानं आपापल्या परीने अमलात आणली पाहिजे. रोजच्या वापरात आपण पाणी किती वापरावे याचे ज्ञान आणि भान असले पाहिजे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:पासून आणि आपल्या घरापासून सुरुवात केल्यास समाज परिवर्तन होऊ शकते, असे मत अमूल्य बुंद फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. आरती भंडारी यांनी व्यक्त केले. कणकुंबी येथील श्री माउली विद्यालयातील विद्यार्थ्यांना पाण्याचं नियोजन आणि प्लास्टिकचे निर्मूलन याबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. आरती भंडारी यांनी मतं व्यक्त केले. डॉ. आरती भंडारी यांनी पुढं सांगितले की, विद्यार्थ्यांनी येणाऱ्या होळीमध्येसुद्धा रासायनिक रंग वापरू नये, साधा रंग वापरून शक्यतो पाण्याचा कमी वापर करावा. तसेच घरात अंघोळ करण्यासाठी शॉवर किंवा इतर आधुनिक पद्धतीचा वापर करण्याऐवजी जुनी पद्धत वापरात आणावी. फळ, भाज्या, धान्य इत्यादी धुण्यासाठी जे पाणी वापरतो, किंवा बाथरूमचे पाणी झाडांना घालावे. पाणी कधीही शिळे होत नाही. तसेच आधुनिक युगात जिकडे तिकडे प्लास्टिकचा अमाप वापर केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व प्लास्टिकजन्य वस्तूमुळे आज अनेक प्रकारचे आजार होत आहेत.
केमिकल्स आणि प्लास्टिकचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने कॅन्सरसारखी भयंकर रोगराई पसरत आहे. प्लास्टिकचा वापर करणे टाळावे. प्लास्टिक पत्रावळीऐवजी केळीची पाने जेवणासाठी वापरावीत. निसर्गाशी समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून अमूल्य बुंद फौंडेशनच्यावतीने गेल्या पंधरा वर्षांपासून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन आणि प्लास्टिकचे निर्मूलन याविषयी जागृती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:पासून सुरुवात करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन अमूल्य बुंद फौंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर आरती भंडारी यांनी व्यक्त केले. यावेळी घरातील पाणी वापराविषयी व प्लास्टिक निर्मूलनविषयी विद्यार्थ्यांना अनेक उपयुक्त असे प्रश्न विचारून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना अमूल्य बुंद फौंडेशनकडून गृहोपयोगी वस्तू तसेच कापडी पिशव्या, घड्याळ व इतर वस्तू विद्यार्थ्यांना बक्षीसादाखल देण्यात आल्या. तसेच फौंडेशनच्यावतीने आठवी आणि नववीच्या विद्यार्थिनीना पोशाखांचे वितरण करण्यात आले. यावेळी फौंडेशनच्या वॉलेंटियर मेंबर शांता सामंत होत्या. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी अमूल्य बंद फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. आरती भंडारी यांच्या कार्याचा परिचय करून देऊन विद्यालयाच्यावतीने स्वागत केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.









