मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, गुणवान 600 विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शिक्षण व आरोग्य क्षेत्राला आपण प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेण्याबरोबर सामाजिक जाणीवही ठेवावी, असे प्रतिपादन महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. 2024-25 मधील एसएसएलसी व पीयुसी द्वितीय परीक्षेत 80 टक्क्याहून अधिक गुण मिळविलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 600 विद्यार्थ्यांना रविवारी गौरविण्यात आले. मंत्री हेब्बाळकर यांच्या कुवेंपुनगर बेळगाव येथील गृह कार्यालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. शिक्षणाला गरिबीचा केव्हाही अडसर होत नाही. त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेण्यावर जोर दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. समाजात काही तर चांगले कार्य करावे या उद्देशाने आपण राजकारणात प्रवेश केला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आल्यानंतर शिक्षण आणि आरोग्यावर अधिक भर दिला. एखादा कारकुन असो किंवा राष्ट्रपती असो प्रत्येकाला आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे ही अपेक्षा असते. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून जीवनात उत्तुंग यश गाठत आई-वडिलांचे ऋण फेडावेत, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









