भाऊराव काकतकर महाविद्यालयात विविध पुरस्कार वितरण सोहळा
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संवेदनशील, दूरदृष्टिकोन, सकारात्मकता, मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वासाने पुढे गेल्यास व सुसंस्कार मनात ठेऊन पुढे वाटचाल केल्यास नक्कीच ठरवलेले ध्येय गाठायला वेळ लागत नाही. हे सूत्र आजच्या पिढीतील प्रत्येक युवक-युवतींनी समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन बेळगाव येथील ज्ये÷ विचारवंत समाजसेवक चार्टर्ड अकाउंटंट आर. एन. हरगुडे यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि सुभाष ओऊळकर कुटुंबीयातर्फे आनंद शिक्षण निधी, बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, मंजुळा मारुतीराव ओऊळकर पुरस्कार, अर्जुनराव ओऊळकर पुरस्कार (असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मुंबई) उत्कृष्ट खेळाडू पुरुष व उत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार वितरण सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या मारुतीराव काकतकर जिमखाना सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील होते. व्यासपीठावर प्रा विक्रम एल. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, कलाकार अजय सपकाळे उपस्थित होते.
रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. परिचय प्राचार्य आनंद पाटील यांनी करून दिला.
सूत्रसंचालन प्रा. ज्योती ओऊळकर यांनी केले. तर चित्रकला शिक्षक गजानन गुंजटकर यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.









