प्रवासासाठी बालरथांचा वापर करावा : शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी
पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारचे खेळ पाहण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक यांना मोकळीक देण्यात यावी आणि खेळांच्या ठिकाणी जा-ये करण्यासाठी बालरथ बस गाड्यांचा वापर करावा, असे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले असून ते सर्व शाळांना पाठविले आहे. शाळा प्रमुखांनी खेळ, त्याचे ठिकाण व वेळ याचा विचार कऊन काय ते ठरवावे आणि त्यानुसार देण्यात आलेल्या लिंकवर नोंदणी करावी. ती नोंदणी पक्की झाल्यानंतर शाळांना त्याबाबत आगावू कळवण्यात येणार आहे. नंतर संबंधित ठिकाणी जाण्याचे नियोजन करावे. विद्यार्थिनींसोबत शिक्षिका देण्यात यावी अशा सूचना परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोव्यात करण्यात आले असून 19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी मिळून 46 प्रकारचे खेळ होणार आहेत. त्यात देशभरातून 10 हजार खेळाडू भाग घेणार आहेत. ते खेळ पाहण्याची मोठी सुवर्णसंधी या निमित्ताने विद्यार्थी वर्ग तसेच गोमंतकीय जनतेला मिळणार आहे. सरकारी तसेच अनुदानित शाळा, उच्च माध्यमिक शाळा, विनाअनुदानित खासगी शाळांनी सदर क्रीडा स्पर्धांत प्रेक्षक म्हणून सहभाग दाखवावा, असे परिपत्रकातून सूचित करण्यात आले आहे.









