प्रतिनिधी /म्हापसा
खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालयात आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याबरोबर पालकांनीही एकच गर्दी केली. काही लहान पहिल्याचवेळा आलेले विद्यार्थी रडताना पहायला मिळाले. मात्र स्कूलच्या दारावर विदूषक पेहराव करून लहान विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पहायला मिळाले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात पालकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच पावसाच्या भीतीमुळे आपल्या चारचाकी गाडय़ा बाहेर काढल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे काहीजण बराचवेळ रस्त्यावर अडकून पडले. विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क घातलेले पहायला मिळाले. शिक्षक वर्ग आरती ओवाळून विद्यार्थ्यांचे स्वागत करीत होते. गेटपाशी आतमध्ये प्रवेश करताना सेनिटरचा वापर करुनच आतमध्ये सोडण्यात येत होते. म्हापसा आमोणकर विद्यालय, ज्ञानप्रसारक विद्यालय आदी स्कूलमध्येही शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केल्याचे पहायला मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षे बंद असलेल्या शाळा आज सोमवारपासून गजबजून गेल्या होत्या. वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱयावरील आनंद स्पष्ट दिसत होता. गेले वर्षभर ऑनलाईन वर्गात हजेरी लावल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रत्यक्ष वर्गात हजेरी लावली आहे.
राज्यात सध्या कोरोना प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क होता. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत केले. विद्यार्थ्यांना वर्गात पोहोचविताना पालकांची मात्र धावपळ दिसून आली. मुलांना शाळेत सोडून पुन्हा कामावर जाण्यासाठी पालकांची कसरत होती. गेली 2 वर्षे मुले घरी असल्याचे पालकांना मुलांना शाळेत सोडावे लागत नव्हते. तेव्हा पालकांचाही नित्यक्रम बदलला होता.
शाळेचा पहिला दिवस असल्याने काही शाळेतील विद्यार्थ्यांना 12 वाजता सोडण्यात आले. काही शाळा दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवल्या होत्या. शाळा 1 वाजेपर्यंत सुरू असणार याची कल्पना पूर्वी पालकांना देण्यात आली नव्हती. मुलांना टिफीन देण्यासाठी पुन्हा पालकांना धावपळ करावी लागली. असे काही ठिकाणी चित्र होते. पहिलीच्या वर्गात प्रवेश केलेले विद्यार्थी सामान्य कपडय़ात होते. नवीन इयत्ता असल्याने पालकांनी युनिफॉर्म शिवला नव्हता. सध्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्मची सक्ती करण्यात आलेली नाही.
शाळेमध्ये तब्बल दोन वर्षानंतर प्रार्थनेचा आवाज ऐकायला मिळाला. अनेक विद्यार्थी प्रार्थना विसरले होते. शाळेची घंटा विद्यार्थ्यांना सुखद वाटत होती. विद्यार्थ्यांना त्यांचे जुने मित्र भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.









