कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठांतर्गत 299 महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मार्च–एप्रिल 2025 उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांपैकी जवळपास 317 विषयांचे निकाल जाहीर केले आहेत. परंतू ज्या महाविद्यालयातील एकही प्राध्यापक पेपर तपासायला गेले नाहीत, अशा 70 महाविद्यालयातील पदवी अंतिम वर्षातील हजारो विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवले आहेत. प्राध्यापकांनी पेपर तपासणी केली नाही, याची शिक्षा हजारो विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवण्यापेक्षा लाखो रुपये वेतन घेऊन पेपर तपासणी न करणाऱ्या प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
विद्यापीठांतर्गत परीक्षांचे पेपर तपासणी करून गुणदान करणे नियमित प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. परीक्षा होऊन महिना उलटला तरी काही महाविद्यालयातील एकही प्राध्यापक पेपर तपासणी करण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल पेंडिंग असल्याचे चित्र आहे. इतरवेळी विद्यार्थ्यांना परीक्षा प्रमाद समितीच्या नियमांचा धाक दाखवणाऱ्या परीक्षा विभागाने पेपर तपासणी न करणाऱ्या विषयतज्ञांवर कायदेशीर कारवाई का करीत नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाचे कामकाज सुरु असते, मग प्राध्यापकांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण निकाल हातात नसेल तर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाला प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कधी पेपर तपासणीतील त्रुटी, फोटो कॉपीला विलंब तर कधी एका विषयाचा पेपर दुसऱ्या विषयाला असा सावळा गोंधळ वारंवार समोर येत आहे. एसआरपीडीच्या माध्यमातून आम्ही सुरक्षितपणे व कॉपीमुक्त परीक्षा घेतो, असा गवगवा करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून संबंधित प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई करीत आर्थिक दंड आकारावा, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
- चोर सोडून सन्याशाला फाशी
पेपर तपासणी महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाने समन्वयाने करावयाची असते. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल देणे विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. कारण राज्यातील इतर विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश कसे घ्यायचे. त्यांच्या करियरचा प्रश्न आहे. यामुळे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ची शिक्षा होत आहे.
- विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून निकाल जाहीर करावे
प्राध्यापकांनी पेपर तपासले नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना त्रास देणे चुकीचे आहे. कारण विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ प्रशासनाने निकाल वेळेत जाहीर करावे.
स्वागत परुळेकर (सदस्य, व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ)
- परीक्षेचे कामकाज टाळल्यास कायदेशीर कारवाई
विद्यापीठांतर्गत ज्या महाविद्यालयांचा उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात सहभाग नाही, अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना समज द्यावी. तसेच जबाबदार व्यक्ती म्हणून प्राचार्यांनी हमीपत्र लिहून दिल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. भविष्यात परीक्षेचे कामकाज टाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा लेखी सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे, शिवाजी विद्यापीठ)








