उळागड्डी खानापूर येथील घटना : दुधात मृत पाल सापडल्याने खळबळ : 90 विद्यार्थ्यांवर उपचार
यमकनमर्डी : सरकारी योजनेतील हुक्केरी मठातून आलेल्या गरम दुधात मृत पाल आढळली असून सदर दुधाच्या सेवनामुळे सरकारी मुलींची कन्नड शाळा, सरकारी उर्दू शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सदर घटना तालुक्यातील उ. खानापूर येथील सरकारी शाळेत घडली. सदर प्रकार मुख्याध्यापक, साहाय्यक शिक्षक, स्वयंपाकी महिलांच्या तातडीने निदर्शनास येताच बाधित विद्यार्थ्यांना उ. खानापूर, संकेश्वर व हुक्केरी येथे मिळेल त्या वाहनातून सरकारी इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात आले. दुपारनंतर बाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, हुक्केरी येथील गुऊशांतेश्वर मठातून आलेले दूध उ. खानापूर येथील सरकारी प्राथमिक कन्नड मुलींची शाळा व सरकारी उर्दू शाळा या दोन ठिकाणी दिले जात होते. त्यावेळी सदर दुधात मृत पाल असल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दूध वितरण थांबविले. दरम्यान, ज्या शाळेत दूध दिले होते. त्या शाळेतील मुलींना पोटदुखी व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली. सदर बाब तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, साहाय्यक शिक्षक व आशा कार्यकर्त्यांनी तातडीने काही मुलांना उ. खानापूरचे सरकारी इस्पितळ, संकेश्वर सरकारी इस्पितळ व अधिक त्रास होत असलेल्या 4 मुलींना हुक्केरी येथील सरकारी इस्पितळात दाखल केले.
वैद्याधिकाऱ्यांनी तातडीने बाधित विद्यार्थ्यांवर उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत दोन तासाने सुधारणा होऊ लागली. या प्रकाराने उ. खानापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध वितरण करणाऱ्या संबधिताचे दुर्लक्ष झाल्याने पालकांतून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, तालुका शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी संकेश्वर येथील सरकारी इस्पितळाला भेट देऊन मुलांच्या आरोग्याची चौकशी केली. व या घटनेमागे कोणती कारणे आहेत, याची चौकशी करू असे सांगितले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हुक्केरी मठातून येणारे दुपारचे गरम जेवण आता विद्यार्थ्यांसह पालकांना असुरक्षित वाटत आहे. संकेश्वर येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेत मसाले भातात मृत पाल आढळली होती. त्यावेळी जेवण विभागाच्या प्रमुखांच्या सदर प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी त्यांनी असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असा विश्वास दिला होता. पण पुन्हा दुधात दुसऱ्यांदा मृत पाल आढळल्याने भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने याविषयी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.









