धोका पत्करुन विद्यार्थ्यांचा प्रवास, बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना धोका पत्करुन शिक्षणासाठी प्रवास करावा लागत आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बस आगारप्रमुखांची बैठक घेऊन तालुक्यातील शाळांच्या वेळानुसार बससेवेचे नियोजन करण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी खानापूर आणि बेळगाव येथे रोज येत असतात. बेळगाव आणि खानापूर येथील शाळा, महाविद्यालयही सकाळच्या सत्रात सुरू होतात. यासाठी विद्यार्थी पहाटे सहापासूनच खानापूरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र खानापुरातील ग्रामीण भागातून खानापूरला येण्यासाठी सकाळी 6 ते 9.30 पर्यंत सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत उभे रहावे लागते. तसेच बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरश: लोंबकळत धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. गेल्यावर्षी नंदगडजवळ असाच प्रवास करताना अपघातही झाल्याची घटना घडली आहे.
खानापूर आगाराच्या गलथान कारभाराचा फटका
खानापूर तालुक्याच्या शिरोली, गुंजी, लोंढा, नंदगड, जांबोटी तसेच देवलत्ती या भागातून सकाळच्या वेळेत विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूरला येतात. मात्र सकाळच्या वेळेत बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी बेळगाव येथे शिक्षणासाठी जातात. खानापूर येथूनही सकाळच्या 8 ते 10 या वेळेत बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांची बेळगावला जाण्यासाठी एकच गर्दी झालेली असते. त्यामुळे आलेल्या बसमधून बेळगावला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. या वेळेत खानापूर बस आगारातून बेळगासाठी बससेवा करणे गरजेचे आहे. मात्र खानापूर बस आगाराच्या गलथान कारभारामुळे खानापूर ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था तसेच बेळगावसाठी सकाळच्या वेळेत सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र याकडे लोकप्रतिनिधीनी साफ दुर्लक्ष केले आहे.
हायटेक बसस्थानक असले तरी एकही नवीन बस नाही
खानापूर बसस्थानक हायटेक झाले असले तरी या हायटेक बस आगारात एकही बस नवीन नाही. दुसऱ्या आगारात वापरलेल्या बसेस खानापूर आगारासाठी देण्यात आलेल्या आहेत. खानापूर बस आगार कायमच वादाचा विषय झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून खानापूर बस आगाराच्या व्यवस्थापनाविरोधात वेळोवेळी मोर्चे, आंदोलने तसेच अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र खानापूर बस आगाराचा कारभार काही सुधारलेला नाही. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत तालुक्यातील बससेवा सुरळीत होण्यासाठी तसेच खानापूर-बेळगाव मार्गावरील बससेवा सुरळीत होण्यासाठी तातडीने बस आगार प्रमुखांना बससेवा सुरळीत करण्यासाठी सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.









