उद्या वितरण करण्याचे मनपा अधिकाऱ्यांचे आश्वासन
बेळगाव : अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना सरकारी योजनेतून लॅपटॉप देण्यात येतात. महानगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी राखीव निधी ठेवण्यात आला आहे. त्यामधून दरवर्षी लॅपटॉप देणे महत्त्वाचे आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून लॅपटॉप देण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार पालक व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडे धावपळ करावी लागत आहे. मंगळवारी पालक व विद्यार्थी आले असता त्यांना गुरुवारी लॅपटॉप देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे.
महानगरपालिका उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्याकडे पालक व विद्यार्थी गेले असता त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याबाबत सूचना करण्यात आली. यावेळी पालकांनी गेले अनेक महिने महानगरपालिकेकडे धावपळ करत आहोत. मात्र केवळ आश्वासनाव्यतिरिक्त आतापर्यंत आम्हाला लॅपटॉप देण्यात आलेले नाहीत. पण नोव्हेंबरमध्ये मुलांची परीक्षा आहे. तेव्हा तातडीने आम्हाला लॅपटॉप द्यावेत, अशी मागणी पालकांनी केली.
गुरुवारी सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. शहरातील विविध भागातून विद्यार्थी व त्यांचे पालक सकाळपासूनच महानगरपालिकेमध्ये लॅपटॉपसाठी ताटकळत थांबले होते. अखेर उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून लॅपटॉप देण्याचे सांगितले आहे.









