बेळगाव : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘यु – जिनिअस २०२३’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत जीएसएस कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
बेळगावमधील कॉलेज रोड येथील महात्मा गांधी भवनमध्ये आज (रविवार दि. २७ ऑगस्ट ) या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत बेळगाव, धारवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील १२५ शाळांमधील आठवी ते १२ वी पर्यंतचे सुमारे १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत टीम मास्टर तन्मय एस. कुरुंदवाड आणि मास्टर प्रज्वल आर. बुगडे या जी एस एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजेत्या संघाची ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील उपांत्य फेरीत निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठा मंडळ इंजि. कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक जी. कुलकर्णी, युनियन बँक ऑफ इंडियाचे उप. झोनल हेड पंकज कुमार कप्सिमे, युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रमुख आरती रौनियार, युनियन बँक ऑफ इंडियाचे हुबळी येथील क्षेत्रीय प्रमुख रामानंद टी. व्ही उपस्थित होते.
पंकज कुमार कप्सिमे यांनी, भारत, तरुण पिढी आणि त्यांच्यातील प्रतिभेच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच तरुण पिढीला शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण भारतात यु -जिनिअस स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच तरुण पिढीला आतापासूनच बचत करण्याची सवय लावून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
सहभागी शाळांच्या संघांना स्मृतीचिन्ह, प्रशंसा प्रमाणपत्र आणि विविध बक्षिसे आणि विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती.









