गर्दीतून जीव मुठीत धरून करावा लागतो रस्ता पार : सावधगिरी बाळगण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : शहरातील बहुतांश शाळा भरतात त्याचवेळी रस्त्यावर गर्दी असते. या गर्दीतून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. मुले घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. तर दुसरीकडे काही पालक आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असतात. मात्र रस्त्यावरील गर्दीमुळे त्यांची दमछाक होते. सन्मान हॉटेलनजीक अशाप्रकारे मुलांसह पालकांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागत आहे. जर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर या परिसरात मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुले ही आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. पण याच भविष्याचे भवितव्य जर दररोज टांगणीला लागत असेल तर गंभीर बाब आहे. कॉलेज रोडवर अनेक शाळा, विद्यालये, महाविद्यालये असून सदर रस्ता रहदारीसाठीही प्रमुख आहे. यामुळे रस्त्यावर सतत गर्दी असते. सकाळपासून सायंकाळपर्यंत हा परिसर विद्यार्थ्यांनी फुललेला असतो. तसेच रस्त्यावरून शेकडो वाहनांचीही वर्दळ असते. यामुळे मुलांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
पालकांचीही तारेवरची कसरत
शाळेय विद्यार्थ्यांना सतत या रस्त्यावरून दिवसभर ये-जा करावी लागते. मात्र धोका पत्करून त्यांना जीव मुठीत धरूनच रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे अपघाताची घटना नाकारता येत नाही. शाळा सुटल्यानंतर या मार्गावर विद्यार्थ्यांचे घोळके येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी वाहनांच्या आधारे घरी जातात. तर काही पालक आपल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी शाळेकडे येत असतात. विद्यार्थ्यांसह पालकांनाही रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
अशावेळी रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य रस्ता असल्याने शेकडो वाहनांची वर्दळ याठिकाणी असते. यामुळे ये-जा करताना सावधानता बाळगावी लागते. नजर चुकल्यास व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास मोठ्या धोका उद्भवू शकतो. यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांसह पालकांनीही सावधगिरी बाळगून ये-जा करण्याची आवश्यकता आहे.
दोन्ही बाजूने सतत वाहनांची वर्दळ असल्याने भीती
सन्मानसमोर असलेल्या रस्त्यावर पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे रस्ता क्रॉस करताना समस्या निर्माण होत आहे. यापूर्वी या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आलेले नव्हते. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करून वाहतूक नियंत्रणात आणण्यात येत होती. मात्र आता बॅरिकेड्मुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होत आहेत. रस्ता क्रॉस करावा म्हटला तर दोन्ही बाजूने सतत वाहनांची वर्दळ असते. यामुळे दुसऱ्या दिशेला जाणे मुश्किल बनत आहे.









