विनायकनगर-हिंडलगा जलतरण तलावात साचले पाणी
बेळगाव : महानगरपालिकेने जलतरणसाठी विनायकनगर-हिंडलगा येथे तलावाचे बांधकाम केले होते. परंतु हे काम अर्धवट स्थितीत असून यामध्ये आता पावसाचे पाणी भरले आहे. जलतरण तलावातील साचलेल्या पाण्यात शाळकरी विद्यार्थी पोहण्यासाठी जात आहेत. याठिकाणी सुरक्षित उपाययोजना नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी एकतर या ठिकाणी सुरक्षा पुरवावी, अन्यथा तलावातील पाणी बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे. जलतरणसाठी महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी टीव्ही सेंटर, अशोक नगर व विनायकनगर-हिंडलगा येथे जलतरण तलाव बांधले. परंतु या पुढील काळात तलावांची कामे पूर्ण झाली नाहीत. वास्तविक पाहता या तलावांवर एक प्रशिक्षक व देखरेखीसाठी एका व्यक्तिची नेमणूक होणे गरजेचे होते. परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हे तलाव तसेच पडून होते. आता त्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरले आहे.
तलावातील पाणी बाहेर काढण्याची मागणी
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी पोहण्यास जात आहेत. विद्यार्थ्यांना जलतरणाची कोणतीही माहिती नसल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. एखाद्या निष्पापाचा जीव जाण्यापूर्वी मनपा प्रशासनाने तलावातील पाणी बाहेर काढावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









