दापोली :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीत शनिवारी झालेल्या आभार मेळाव्यासाठी दापोली आगाराच्या तब्बल ३५ गाड्या गेल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने त्याचा फटका प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना बसला. बारावीच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळची मांदिवली, वेळवी, किन्हळ, दाभोळ, गावरई, खेड, कर्दे, दाभोळ, पाजपंढरी, कोंगळे, ताडील, केळशी, गोंधळेकरवाडी, खरवते आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. दापोलीतील न. का. वराडकर बेलोसे महाविद्यालय व वाकवली येथील वि. रा. गोळे हायस्कूलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वाणिज्य शाखेच्या परीक्षा होत्या. अचानक गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सकाळी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. तसेच पनवेल, बोरिवली, कोल्हापूर, रत्नागिरी, शिर्डी, अक्कलकोट, गणपतीपुळे, कोल्हापूर आदी लांब पल्ल्याच्या मार्गावरील गाड्याही रद्द करण्यात आल्या. कोणतीही पूर्वसूचना न देता गाड्या रत्नागिरीला पाठवण्यात आल्याने प्रवाशांची बसस्थानकात गर्दी पहायला मिळाली. आपली गाडी सुटणार नाही, असे कळल्यानंतर प्रवाशांनी बसस्थानकात गोंधळ घातला.








