सोन्याळ :
पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येऊ लागली. आता पुन्हा त्यामध्ये बदल करुन चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा, यासाठी वर्षानुवर्षे पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे अनुक्रमे चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या संदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हा बदल होणार आहे.
राज्यभरातून दोन्ही परीक्षांचे मिळून तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. यापैकी नऊ ते १० हजार विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीस पात्र होतात. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर किमान वर्षभर अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा बदलाची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल लवकरच करण्यात येणार आहेत.
यामुळे विद्यार्थी- पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या बदलाची लवकर माहिती मिळणार आहे. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेंतर्गत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शाळा (पाचवी) सर्व संचाकरीता ५०० रुपये प्रतिमाह, माध्यमिक शाळा (आठवी) सर्व संचाकरीता ७५० रुपये प्रतिमाह इतकी शिष्यवृत्ती मिळते.
- जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणार बदल
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी व पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरीबांची असतात. त्यांना गलेलठ्ठ डोनेशन भरुन मोठ्या शाळेत प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे या गोरगरीबांच्या मुलांसाठी या परीक्षेमध्ये बदलाच्या हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हायस्कूलमध्ये गेल्यावर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
- अद्याप शासनाची मंजुरी नाही
चौथी, सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, शासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही. शासनाने मंजुरी दिल्यास पाचवी, आठवीऐवजी चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल.
-अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य








