आष्टा :
सांगली पेठ रस्त्यावर आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालय, कन्या हायस्कूल, आणि के बी पी इंग्लिश मीडियम स्कूल आदी ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच शाळा भरते आणि सुटतेवेळी ट्रॅफिक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी शहरातील पालक वर्गातून होत आहे.
सांगली पेठ नाका हा नव्यानेच रस्ता बनवलेला आहे. यामुळे भरधाव वेगाने वाहने जात आहेत. आष्ट्यातील या रस्त्याचे शेजारील महात्मा गांधी विद्यालय, कन्या हायस्कूल आणि केबीपी इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने विद्यालयातील शिक्षकच ट्राफिक पोलिसाची भूमिका बजावत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर वाहनांची गती कमी होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर तत्काळ बसवावेत, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. शाळा भरताना आणि सुटतेवेळी ट्रॅफिक पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणीही जोर धरत आहे.
याबाबत समीर गायकवाड म्हणाले, सांगली पेठ हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात घडत आहेत. आष्टा शहरातील महात्मा गांधी विद्यालय, कन्या हायस्कूल आणि केबीपी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. विद्यार्थी ज्या ज्या ठिकाणी रस्ता ओलांडतात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी अनेकवेळा केली आहे. मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही.
बाबासो सिद्ध म्हणाले, सांगली इस्लामपूर रस्त्यामुळे आष्टा शहरातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत. वाहनांचा वेग वाढल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या ठिकाणी पोलिसांनी कायमस्वरूपी ट्राफिक पोलिसाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.








