विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून राहणार वंचित; योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थ्यांचा विनाअनुदानित शाळांत प्रवेश; प्रशासनाकडून शिष्यवृत्ती देण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित
कृष्णात चौगले कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यातून इयत्ता 8 वी तील हजारो विद्यार्थी एनएमएमएस परीक्षा देतात. यामधील दरवर्षी सुमारे दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. पात्र विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वी पर्यंत दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती दिली जाते. शासन नियमानुसार शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अनुदानित शाळेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. पण चालू शैक्षणिक वर्षात 10 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी अजाणतेपणी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे असे शेकडो विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहे. सदरचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असल्यामुळे त्यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेतला असला तरीही त्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत अशी मागणी पालकांतून होत आहे.
सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाते. एनएमएमएस परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱया विद्यार्थ्यांना वार्षिक 12 हजार एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 9 वी ते 12 वी पर्यंत एकूण 48 हजार रूपये मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होतो.
आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती 12 वी पर्यंत मिळते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा 1 हजार ( वार्षिक 12 हजार रुपये) आहे. 8 वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न 3 लाख 50 हजारांपेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिक्षण घेतात, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते. पण योग्य मार्गदर्शनाअभावी ज्या शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. अन्यथा अर्थिक दुर्बलतेमुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये शासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अनुदानित शाळांतच प्रवेश घेणे आवश्यक
एनएमएमएस शिष्यवृत्ती ही अर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी अनुदानित शाळांमध्येच प्रवेश घेणे आवश्यक आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून साहजिकच अर्थिक सबल मानले जाते. त्यामुळे संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी अनुदानित शाळांमध्येच प्रवेश घेणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची की नाही याबाबतचे सर्वाधिकार शासनाला आहेत.
आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर









