कन्नड पेपरला 28 जणांची अनुपस्थिती : आजपासून मुख्य परीक्षा
बेळगाव : कर्नाटकात इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी सीईटी परीक्षेअंतर्गत कन्नड विषयाचा पेपर घेण्यात आला. 50 गुणांच्या या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 66 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. 38 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. तर 28 उमेदवार अनुपस्थित राहिले. इंजिनिअरिंग तसेच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावर्षी बुधवार दि. 16 व गुरुवार दि. 17 रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. 16 रोजी भौतिक व रसायन शास्त्र व 17 रोजी गणित व जीवशास्त्र विषयांची परीक्षा होईल. बेळगाव शहरातील 21 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही व तसेच इतर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
बारावीनंतर महाराष्ट्र, गोवा तसेच इतर राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी कर्नाटकाला प्राधान्य देतात. या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेपूर्वी कन्नड विषयाची 50 गुणांची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. कन्नड विषयासह सीईटीच्या इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच रॅकिंग लावले जाते. मागील काही वर्षांपासून ही परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सीईटीच्या गुणांवरच पुढील प्रवेश निश्चित केला जातो. त्यामुळे 12 वी मुख्य परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी मागील वर्षभरापासून मेहनत घेतली आहे. सीईटीसोबतच जेईई व नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.
या साहित्यावर निर्बंध…
- लांब हाताचे शर्ट,
- जादा खिस्से असलेली पँट,
- कुर्ता-पायजमा, जिन्स, बूट
- मोबाईल, पेनड्राईव्ह, इअरफोन, डिजीटल वॉच
- आवश्यक साहित्य
- प्रवेशपत्र, ओळखपत्र
- निळ्या व काळ्या शाईचे पेन
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये बुधवारपासून सीईटी परीक्षेला सुरुवात होत आहे. मंगळवारी परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी कन्नड विषयाची 50 गुणांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
– एम. एम. कांबळे, (पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी)









