बुधवारी शिक्षण विभागाकडून सुटी जाहीर : भर पावसातही विद्यार्थीवर्ग खेळण्यात मश्गूल
बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यात झालेल्या धुवाधार पावसाने बुधवारी शाळा तसेच पीयूसी कॉलेजना सुटी देण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी पावसामध्ये फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. बऱ्याच ठिकाणी भरपावसात विद्यार्थी खेळत असल्याचे चित्र दिसत होते. मान्सूनने शहरासह उपनगरांना झोडपून काढले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बेळगाव व खानापूर तालुक्यात काही ठिकाणी नद्या व नाल्यांना पाणी आल्याने संपर्क रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ये-जा करणे शक्य नसल्याने शिक्षण विभागाने सुटी जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली. सुटी मिळाल्याने विद्यार्थीवर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत होता. घरी राहण्यापेक्षा क्रिकेटचा आनंद घेणारे विद्यार्थी दिसून आले. शहरातील सरदार्स हायस्कूल ग्राऊंड, धर्मवीर संभाजी उद्यान आदी मैदानांवर विद्यार्थी खेळांचा आनंद घेत होते. काही ठिकाणी क्रिकेट तर काही ठिकाणी फुटबॉल व व्हॉलिबॉल खेळताना तरुणाई दिसत होती.









