21 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक मदत व्हावी, यादृष्टीने समाज कल्याण विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, आधारकार्डमधील नाव व बँक खात्यातील नाव यामध्ये फरक असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मागीलवर्षी अंदाजे 21 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 700 ते 2 हजार रुपयांपर्यंत वर्गवारीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. जुलै महिन्यापासून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करतात. सध्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जात आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून आधार क्रमांक व बँक पासबुक क्रमांक घेतला जातो. परंतु, या दोन्ही पुराव्यांमधील नावामध्ये ‘स्पेलिंग मिस्टेक’ आढळल्यास शिष्यवृत्ती नाकारली जात आहे.
मागीलवर्षी ज्या विद्यार्थ्याचे नाव आधारकार्ड व बँक पासबुकमध्ये योग्य आहे, त्याच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज आधारकार्डमधील चुकांमुळे प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांचे पालक समाज कल्याण विभाग तसेच शाळांमध्ये जाऊन शिष्यवृत्तीसंदर्भात चौकशी करीत होते. परंतु, नावातील चुकांमुळे त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध होऊ शकली नाही. अंदाजे 21 हजार अर्ज प्रलंबित असल्याने पालकांनी आता जागरुक होण्याची गरज आहे. आधारकार्डवरील नावाप्रमाणेच बँक पासबुकमधील नाव बरोबर आहे का? हे पालकांना तपासावे लागणार आहे. स्पेलिंगमध्ये थोडी जरी चूक असेल तर ती बदलावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी आधारकार्ड व बँक पासबुकमधील नाव तपासणे गरजेचे असणार आहे.









