विश्वनाथ मोरे, कसबा बीड, प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द,कोगे,महे,कसबा बीड,बीडशेड,बहिरेश्वर या गावासाठी गंगावेश ते बहिरेश्वर एकच केएमटी बस आहे. या पाच गावातील लोकसंख्या जवळपास 20000 च्या आसपास असल्याने उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूरला प्रवास करावा लागतो.एकच बस असल्यामुळे वेळेत कॉलेजला पोहोचण्यासाठी एकदम गर्दीमध्ये एका पायावर उभे राहून व दरवाजाला लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
के. एम. टी उत्पादनात वाढ होण्यासाठी व शहराला लागून असणाऱ्या नागरिकांना शहराशी जोडली जावे या हेतूने केएमटी बसचे नियोजन महानगरपालिकेकडून करण्यात आले.ज्या मार्गावर प्रवासी नाही ,त्या मार्गावरती बसेस जास्त व ज्या मार्गावर प्रवासी आहेत ,त्या मार्गावर बसेस कमी असा विरोधाभास केएमटी प्रशासनाकडून दिसून येत आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना सोयी व सुविधा पुरवण हे ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे.विद्यार्थ्यांना व गावासाठी सरकारच्या माध्यमातून व ग्रामपंचायतच्या साथीने वाहतूक सोय निर्माण करणे ही प्रमुख गरज आहे.याकडे ग्रामपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना कामावर वेळेत हजर राहण्यासाठी वाहतुकीची अनेक साधने निर्माण झालेली आहेत.पण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी सवलतीच्या दरात शासकीय वाहतूक महाराष्ट्र राज्य महामंडळ एसटी बस व कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी बस हे दोनच पर्याय आहेत.त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शिक्षणाचे व वेळेत प्रवास करण्याचे टेन्शन येत आहे.दरवाजामध्ये लोंबकळत प्रवास करू नये यासाठी चालक-वाहक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची होत असते.
कॉलेजला वेळेवर पोहोचण्यासाठी जीवघेणा प्रवास करत गेल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या जवळ दुसरा पर्याय नाही.यावर एकच पर्याय आहे की पहिल्याप्रमाणे या रूटवर दोन बसेस चालू करणे. आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक या हेतूने शासन स्तरावर चाललेल्या या सर्व योजना फक्त कागदावरच आहेत का ?वेळेत प्रवास करण्यासाठी केएमटी बस संख्या वाढणार का ?के. एम. टी बस फेरी वाढण्यासाठी ग्रामपंचायतकडून पाठपुरावा होणार का? आदी प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.









