ऐन परीक्षेच्या काळात वीज गायब होण्याचा प्रकार : विद्यार्थीवर्गाचे हाल : जंगल भागातील जीर्ण वीजखांब-तारा बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
वार्ताहर /कणकुंबी
तालुक्याच्या जांबोटी-कणकुंबी या पश्चिम भागात विजेची गंभीर समस्या नेहमीचीच असून ऐन परीक्षेच्या काळात वीज गायब होत असल्याने सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत उजेडाविना अभ्यास हा चिंतेचा विषय बनला आहे. सायंकाळी किंवा रात्री गेलेली वीज दुसऱ्या दिवशीच सकाळी नऊनंतर प्रगट होते. दररोज रात्री विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ आणि वीज खंडित (गायब) हा प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या बारावीची बोर्ड परीक्षा सुरू झाली असून, येत्या 25 पासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जांबोटी-कणकुंबी या जंगलमय भागातील विजेची गंभीर समस्या नेहमीच नागरिकांना डोकेदुखी बनलेली आहे. सर्व गरजा वीजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे बारा-बारा तास वीज गायब झाली तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मान, हुळंद, चोर्ला, आमगाव व तळावडे आदी गावांतील नागरिकांना दरवर्षीच ही समस्या भेडसावत आहे.
33 केव्ही वीजकेंद्राचे वीस वर्षांपासून भिजत घोंगडे
जांबोटी-कणकुंबी भागातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने जांबोटी या ठिकाणी 33 केव्ही उपवीज केंद्र मंजूर करण्याचा प्रस्ताव तत्कालीन माजी आमदार कै. अशोक पाटील यांनी विधानसभेतून मंजूर करून घेतला होता. तत्कालीन वीजमंत्री वीरकुमार पाटील यांनी त्याला मंजुरीही दिली होती. परंतु जांबोटी येथे उपवीज केंद्र उभारण्यासाठी ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हापासून गेली 20 वर्षे जांबोटी येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे काम रेंगाळत पडले आहे. आता विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपवीज केंद्राचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खांब, वीजतारा बदलण्याची मागणी
जांबोटी-कणकुंबी भागातील 40 ते 50 वर्षांपूर्वी घातलेले विद्युत खांब आणि विद्युत तारा बदलण्याच्या बाबतीत देखील भेदभाव करण्यात आला आहे. कणकुंबी भागातील काही गावातील जुने विद्युत खांब आणि तारा बदलण्यात आलेल्या आहेत तर उर्वरित नऊ ते दहा गावातील तारा बदलण्याचे काम थांबलेले आहे. विशेषत: पावसाळ्dयांत चाळीस वर्षांपूर्वीचे हे जीर्ण खांब मोडून तर तारा ठिकठिकाणी तुटून पडत आहेत.
पश्चिम भागात भूमिगत वीजवाहिन्यांची गरज
नजीकच्या जोयडा तालुक्यातील जंगलमय भागात भूमिगत वीजवाहिन्या घातलेल्या आहेत. परंतु खानापूर तालुक्याच्या जांबोटी, कणकुंबी भागात ही योजना का राबवली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. विशेषत: जंगलमय भागांमध्ये खांबावरून वीज नेण्यापेक्षा भूमिगत वीजवाहिन्या घालून विद्युत पुरवठा केला तर जंगली प्राण्यांना देखील धोका पोहोचणार नाही. अनेक जंगलमय भागांमध्ये ही योजना राबवली जाते, मात्र खानापूर तालुक्याच्या बाबतीत याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
सुरल गावाला भूमिगत विद्युत पुरवठा
कणकुंबी, चोर्ला, पणजी मार्गावरील कणकुंबीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवा हद्दीतील सुरल गावाला पूर्वी कर्नाटकातून विद्युतपुरवठा केला जात होता. परंतु वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे गोव्यातील सुरल गावचे लोक वैतागून गेले होते. त्यामुळे नागरिकांनी गोव्यातून भुयारी मार्गाने वीजवाहिनी घालून गावाला वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे गोवा शासनाने केवळ एका गावासाठी गोव्यातून सुरल जंगलातून भूमिगत वीजवाहिन्या घालून विद्युतपुरवठा केला आहे.
वन्यप्राण्यांना लोंबकळणाऱ्या तारांचा धोका
अनेक वर्षापासून पावसाळ्dयात सुसाट वाऱ्यामुळे वीजखांब मोडणे, तारा तुटून पडणे असे प्रकार घडतच असतात. कणकुंबी भागातसुद्धा वन्यप्राणी अनेकवेळा विजेचे शिकार बनले आहेत. दोन वर्षांपूर्वी गवी रेड्याला तारेचा स्पर्श होऊन जागीच गतप्राण झाला होता. अशा घटना अनेकवेळा घडलेल्या आहेत. अशावेळी मात्र वनखाते हेस्कॉमकडे बोट दाखविते. यासाठी भूमिगत वीज वाहिन्या घालण्याच्या योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन भविष्यात लोंबकळणाऱ्या तारांपासून वन्यप्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी वनखात्याने सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.
वीजेअभावी अभ्यासावर परिणाम…
खानापूर हेस्कॉमकडून कणकुंबी, चोर्ला भागात सुरळीत विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. विशेषत: आम्हा शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे. दहावीची परीक्षा तोंडावर आलेली असताना आम्हाला अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध नसते. घरी गेल्यानंतर सात ते साडेसातला अभ्यासाला बसतो न बसतो, तोच लाईट जाते.
– कु. पूजा गावकर (विद्यार्थिनी)
जागा मिळाल्यास 33 के. व्ही. स्टेशनसाठी परवानगी देऊ!
जांबोटी भागात 33 केव्ही स्टेशन उभारणीसाठी बैलूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण जागा खरेदीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सदर जमीन गावठाण असल्याने खरेदी विक्री करण्याच्या कायद्यात सुधारणा करण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत. विधानसभेत त्या पद्धतीचा ठराव झाल्यानंतरच बैलूर येथील 33 केव्ही स्टेशनला चालना मिळणार आहे. आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करत असून सरकारदरबारी हे काम आता प्रलंबित आहे. जर एखादी खासगी दोन एकर जमीन आम्हाला मिळाल्यास लवकरात लवकर त्याला परवानगी मिळू शकते.
– कल्पना तिरवीर (सहाय्यक कार्यकारी अभियंत्या, खानापूर उपविभाग)










