पुणे / प्रतिनिधी :
स्थानिक भाषांचा उच्च शिक्षणात वापर वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले, तरी परीक्षा स्थानिक भाषेत देण्याची मुभा द्यावी, असेही यूजीसीने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना सूचित केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात स्थानिक भाषांचा प्रसार होण्यास मदत मिळणार आहे.
प्रत्येक राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांतर्फे स्थानिक भाषेत शैक्षणिक प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणे उत्साहवर्धक आहे. त्यामुळे शिक्षण, परीक्षा आणि मूल्यांकन स्थानिक भाषेत झाल्यास विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल आणि त्यांच्या यशाची टक्केवारी वाढू शकेल, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.
स्थानिक भाषेत शिक्षणासाठीचे धोरण निश्चित करण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये स्थानिक भाषातील पाठय़पुस्तके, संदर्भग्रथांची विषयनिहाय सूची, स्थानिक भाषेत अनुवादित केली जावीत. लिहिली जावीत, अशी अभ्यासक्रमांची, पुस्तकांची सूची तयार करणे, स्थानिक भाषेत लिहू शकणाऱ्या, अनुवाद करू शकणाऱ्या शिक्षक, तज्ञांची उपलब्धता, स्थानिक भाषेत पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांची उपलब्धता, अभ्यास साहित्य स्थानिक भाषेत आणण्यासाठीची योजना, विद्यार्थी परीक्षेत स्थानिक भाषेत उत्तरे लिहू शकतात का, आदी माहिती सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.








