चरावणे येथील धबधब्यावर गेले होते पदभ्रमण मोहिमेसाठी
वाळपई : ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असतानासुद्धा धोका पत्करून शिवोली येथील एस. एफ. एक्स. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चरावणे येथील धबधब्यावर पदभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली होती. अचानकपणे पाऊस लागल्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाली. यामुळे पदभ्रमण मोहिमेतील 47 विद्यार्थी व पाच शिक्षक अडकून पडले आणि एकच खळबळ निर्माण झाली. शेवटी वाळपई अग्निशामक दलाचे जवान, चरावणेचे ग्रामस्थ, अभयारण्याचे परिक्षेत्र विभागाचे कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने सर्वांना सुखरूप वाचविण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र विद्यालयाच्या या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. महिन्यापूर्वी पणजी येथील रोझरी विद्यालयाचे विद्यार्थी पाली येथील धबधब्यावर अडकले होते. त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवोली येथील एस.एफ.एक्स उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पदभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यात 47 विद्यार्थी, विद्यार्थिनी व पाच शिक्षकांचा हा गट सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चरावणे येथील धबधब्यावर पोहोचला होता. त्यांना निसर्गाची माहिती, वेगवेगळ्या झाडांची माहिती देण्यात आली. डोंगराळ भागामध्ये पदभ्रमण करण्याचा अनुभव देण्यात आला.
अचानक मुसळधार पाऊस
सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे धुवाधार पाऊस सुरू झाला. कोसळणाऱ्या धबधब्यामधून चिखलमिश्रित पाणी खाली येऊ लागले. यामुळे प्रसंगावधान राखून धबधब्यावर असलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी धबधब्यातून काढता पाय घेतला. डोंगराळ भागातून खाली येत असताना वाटेवर असलेल्या दोन ओहाळाचे पाणी अचानकपणे वाढले होते. यामुळे त्यांना नदी ओलांडता शक्य झाले नाही. यामुळे भीतीची परिस्थिती निर्माण झाली.
वन कर्मचारी, अग्निशामक धावले मदतीला
यासंदर्भात माहिती देताना पदभ्रमण करणाऱ्या मुलांनी सांगितले की, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अचानकपणे वाढ झाल्यामुळे नदी ओलांडता येणे शक्य होत नव्हते. यामुळे वन खाते व अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला. यावेळी अभयारण्य परिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अभयारण्य परिक्षेत्र अधिकारी सुशांत मळीक, प्रेमकुमार गावकर, नारायण पिरणकर, पांडुरंग गावकर, विशाल चोर्लेकर, वामन गावकर यांची महत्त्वाची मदत मिळाली.
सर्वांना सुखरुपरित्या वाचविले
नदीच्या पलीकडे सर्व विद्यार्थी व शिक्षक अडकले होते. त्यांना नदी ओलांडता येणे शक्य नव्हते. त्यामुळे दोरखंड बांधून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले. काही मुलांना उचलून नदीपार करण्यात आली. कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे वनकर्मचारी व अग्निशामक दलाच्या जवानांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आयोजकांनी धोका पत्करलाच कशाला?
गोवा सरकारच्या हवामान खात्याने 23 व 24 सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केलेला आहे. दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. असे असतानाही या विद्यालयाच्या व्यवस्थापनाने धोका पत्करून पदभ्रमण मोहिमेचे आयोजन का केले? विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा जीव धोक्यात का घातला? असे सवाल स्थानिक ग्रामस्थांनी केले आहेत. हा चुकीचा निर्णय मुलांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे कोणीही असा धोका पत्करुन चरावणेत येऊ नका, अशी विनंती चरावणे ग्रामस्थांनी केली आहे.
अग्निशामक दलाचे उत्कृष्ट कार्य
वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. कोणत्याही प्रकारची दुखापत त्यांना झालेली नाही. नदी ओलांडण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून त्यांना मदत केली. सुमारे दोन तास बचाव कार्य सुरू होते. सायंकाळी 4 वा. सुमारास सर्वांना नदी ओलांडण्यासाठी मदत करण्यात आली आणि त्यांना सुखरुपरित्या संकटातून बाहेर काढले. अरविंद देसाई, अशोक नाईक, सोमनाथ गावकर, चाऊदत्त फळ, कालिदास गावकर, दत्ताराम देसाई, संदीप गावकर, प्रदीप गावकर, रामा नाईक, लवशिंग पिल्ले, ऊपेश गावस यांनी अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी केली.









